लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन-चार दिवसात त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा जाणवत नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. 4 जुलैपासून त्यांच्यावर लखनौमधील ‘एसजीपीजीआयआयएमएस’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीत विशेष वैद्यकीय पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. कल्याण सिंह यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा यांच्या प्रकृतीची सतत विचारपूस करत आहेत.