प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगूट येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात पुजण्यात आलेल्या 11 दिवशीय सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थी दिवशी कळंगूट येथील समुद्रात मोठय़ा उत्साहाने भक्त मंडळीतर्फे करण्यात आले. सायं. 3 वा. पारंपरिक गाऱहाणे व आरत्या होऊन श्रीची मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. यंदा कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सी सांभाळून भक्ती भावाने श्रीची मूर्ती कळंगूट समुद्रावर नेण्यात आली. तेथे गावचे नागरिक एकनाथ नागवेकर यांनी पारंपरिक गाऱहाणे घातले.
कोविडपासून सर्वांची मुक्तता करावी व पुढील वर्षी धूमधडाक्यात गणेश चतुर्थी साजरी व्हावी असे त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग मठकर व सचिव सदानंद नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.