चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
सध्याची युवापिढी अशी, सध्याची युवापिढी तशी असे तक्रारीचे सूर नेहमीच ऐकावयास मिळत असतात. मात्र, याच युवा पिढीतील सांगली जिल्हय़ातील एक युवक व एका युवतीने परिश्रमातून एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. दोघांचेही अंतिम ध्येय पोलीस उपनिरीक्षक बनण्याचे होते. दोघांनीही ते स्वप्न साकार केले. योगायोगाने त्यांचे ऍरेंज मॅरेजही झाले आणि सध्या दोघेही पती, पत्नी उपनिरीक्षक पदी सातारा पोलीस दलात कार्यरत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अमित गणपती पाटील व पोलीस उपनिरीक्षक धनश्री बाळासाहेब भगत-पाटील असे सिंघम जोडीचे नाव असून सोशल मिडियावर त्यांच्या व्हायरल झालेल्या पोस्टवर दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस दलात पती, पत्नी दोघेही अधिकारी असल्याचे हे दुर्मिळ उदाहरण असल्याने त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांची प्रेरणादायी कहाणी समोर आली.
अमित गणपती पाटील यांचे मूळ गाव मिरज तालुक्यातील आरग आहे. आरग हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. तर मिरजच्या बापूजी साळुंखे महाविद्यालयात बारावी सायन्स पूर्ण केले. मग मिरजमध्येच डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. तर नंतर शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयातून बीए पूर्ण केले. त्यानंतर बीएड झाल्यानंतर शिक्षकच व्हायचे होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी एमपीएसी परीक्षा दिली. त्यात ते यशस्वी झाल्यावर 2018 मध्ये नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये 14 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना 2019 मध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्यात पहिले पोस्टिंग मिळाले अन ते तिथेच कार्यरत आहेत.
धनश्री भगत यांचे मूळ गाव सांगली जिल्हय़ातील तासगाव तालुक्यातील ङमांजर्डेङ आहे. त्यांचे वडील बाळासाहेब भगत हे बेदाण्याचे व्यापारी आहेत. तर त्यांचे काका पोलीस दलात अधिकारी असल्याने धनश्री यांनाही पोलीस दलाविषयी आर्कषण होते. तासगावच्या वसंतदादा पाटील महाविद्यालयातून इतिहास विषयातून एम. ए. पदवी घेतल्यानंतर कॉलेजचे प्राचार्य जी. के. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून त्यांनी 2016 मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांनी प्रथम टॅक्स अस्टिटंट पदाची निवड केली. रुजूही झाल्या पण नंतर राजीनामा देवून पोलीस उपनिरीक्षक पदाची निवड केली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनाही योगायोगाने पहिलेच पोस्टिंग सातारा शहर ठाण्यात मिळाले आहे.
योगायोगाने जुळली जन्माची नाती
अमित पाटील व धनश्री भगत दोघांनीही एमएमएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर योगायोगाने दोघेही नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये एकत्र होते. धनश्री या फक्त सांगली जिल्हय़ात आहेत एवढीच दोघांमध्ये ओळख होती. मात्र, ट्रेनिंगनंतर पोस्टिंग झाल्यावर लग्नाचा विचार सुरु झाला तेव्हा पाहुण्यांकडूनच धनश्रीचे स्थळ आले. दोघेही उपनिरीक्षकपदी कार्यरत होते. मग योगायोगाने दोघांचे जन्माचे नाते जुळले आणि दोघेही 12 जुलै 2020 मध्ये विवाहबध्द झाले आहेत.
पाटलांच्या घरात सगळे शिक्षकच
अमित पाटील यांचे वडील गणपती हे शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. पाटील यांच्या दोन बहिणीही शिक्षकच आहेत. अमित देखील शिक्षकच होणार होते. मात्र एमपीएससीत यश मिळाले आणि मग पोलीस उपनिरीक्षक होवून ते पोलीस खात्यात दाखल झाले आहेत. अभ्यासाची आवड होतीच. परिश्रम घेतले आणि यश मिळाले. आम्ही दोघेही पोलीस दलात असल्याने आमचे चांगले टय़ुनिंग जमले असल्याचे अमित पाटील यांनी सांगितले.
परिश्रम घेतल्यास यश हमखास मिळतेच
माझे वडील शिक्षक असल्याने शिस्त व संस्कारात मी वाढलो. उपनिरीक्षक झालो नसतो तर शिक्षकच झालो असतो. एमपीएससी परीक्षा देताना अभ्यासाची मेहनत घ्यावीच लागते तर पोलीस दलात यायचे म्हटले की शारीरीक फिटनेस आवश्यक असतो. मात्र परिश्रम घेतल्यास यश मिळते, हा संदेश मला युवक मित्रमैत्रिणींना द्यायचा आहे. धनश्री यांनी देखील त्यांच्या काकांकडून प्रेरणा घेवून व आई वडिलांच्या जिद्दी साठी या यशाला गवसणी घातली असल्याचे अमित पाटील यांनी सांगितले.
फेसबुकमुळे सिंघम जोडी व्हायरल
पोलीस खात्यातील सर्व ताणतणावात काम करणाऱया उपनिरीक्षक अमित पाटील व धनश्री पाटील यांचा त्यांच्या लग्नापूर्वी केलेल्या फोटोशूटमधील वर्दीवरचा फोटो व्हायरल झाला आहे. त्याला हजारो लाईक मिळाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही झाला आहे. या पोलीस उपनिरीक्षक जोडीच्या मागे सर्व युवक, युवतींना प्रेरणा देणारी
कहाणी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर समोर आली. त्यांच्या भावी जीवनास नव्या वर्षाच्या निमित्ताने देवूया.