यंदा प्रथमच मतमोजणी शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात
प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यातील खोल आणि पैंगीण या दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघांत आज होणाऱया निवडणुकीसाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी कार्यालय सज्ज झाले असून 14 रोजी होणाऱया मतमोजणीमध्ये जे कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी खास प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच झाला. या तालुक्यातील निवडणुकीवर नजर ठेवण्यासाठी कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून वेळीप यांनी तालुक्याला भेट देऊन संपूर्ण आढावा घेतला आहे.
जिल्हा पंचायतीची निवडणूक प्रक्रिया कसलाच अडथळा न येता सुरळीतपणे पार पडावी यासाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी असलेले निर्वाचन अधिकारी सतीश प्रभू आणि मामलेदार विमोद दलाल लक्ष ठेवून आहेत. या निवडणुकीसाठी खोल मतदारसंघातील 1 ते 12 मतदान केंद्रांसाठी काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी कीर्तिराज ना. गावकर, 13 ते 22 मतदान केंदांसाठी महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता सुभाष पागी हे सेक्टर अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तर पैंगीण मतदारसंघातील 1 ते 8 आणि 11 ते 18 मतदान केंद्रांची जबाबदारी पाणीपुरवठा खात्याचे साहाय्यक अभियंता लेस्टर डिसोझा आणि 9, 10 आणि 19 ते 29 मतदान केंद्रांची सेक्टर अधिकारी म्हणून जबाबदारी बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता नागेश आचारी सांभाळत आहेत.
मतमोजणी स्थळात बदल
यापूर्वीची काणकोणातील मतमोजणी चावडीवरील पालिका सभागृहात केली जायची. त्यामुळे एकंदर मार्केटवर होणारा परिणाम टाळण्यासाठी यंदा प्रथमच शेळेर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीमधील वर्गखोल्यांत 14 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी एकूण 10 वर्गखोल्यांची सोय करण्यात आली आहे. 14 रोजी सकाळी सर्वप्रथम खोल मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 12 रोजी मतदान झाल्यानंतर प्रशासकीय इमारतीमधील जागेत अत्यंत कडक सुरक्षेत मतपेटय़ा ठेवल्या जातील. सर्व उमेदवारांचे निवडणूक एजंट, उमेदवार यांच्या उपस्थितीत मतपेटय़ा सुरक्षित स्थळी ठेवल्या जातील. 14 रोजी सकाळी 7 वा. सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेटय़ा मतमोजणी स्थळावर नेल्या जातील आणि त्यानंतर मतमोजणीला प्रारंभ होईल. 11 रोजी सकाळी 10 पासून पैंगीणमधील 29, तर खोलमधील 22 मतदान केंद्रांवर मतपेटय़ा आणि अन्य सामग्री पोहोचविण्याची प्रक्रिया अत्यंत कडक सुरक्षेत राबविण्यात आली, अशी माहिती काणकोणचे निर्वाचन अधिकारी प्रभू यांनी दिली.