प्रतिनिधी/ काणकोण
गोव्याच्या दक्षिणेकडील काणकोण तालुक्यात कोरोनाबाधित वाढत चालले असून या तालुक्यातील प्रत्येक गावात तर संसर्ग पोहोचणार नाही ना अशी शंका आता सर्वच स्तरांतून व्यक्त व्हायला लागली आहे. आतापर्यंत काणकोण तालुक्यात एकूण 11 रुग्ण आढळले असून यापैकी 3 रुग्णांची उपचारांनंतर ठीक झाल्याने परत पाठवणी करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी आगोंद पंचायत क्षेत्रात आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे पर्यटनक्षेत्र असलेल्या आगोंद परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सावधगिरीचा उपाय म्हणून या पंचायतीमधील नागरिकांनी आठवडाभर स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यापूर्वी संपूर्ण काणकोणात 4 दिवस, तर खोल पंचायतीने एक आठवडा स्वेच्छा लॉकडाऊन पाळलेला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून स्वेच्छा लॉकडाऊन केले, तरी देखील जोपर्यंत गोव्यातील चेकनाके बंद होत नाहीत तोपर्यंत या गोष्टींचा काहीच फायदा नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने स्वतःहून काही बंधने पाळली नाहीत, तर स्वेच्छा लॉकडाऊनचा काहीच फायदा होणार नसल्याचे मत येथील एक ज्येष्ठ नागरिक दिवाकर भगत यांनी व्यक्त केले.
जंगलातील वाटा, पोळे किनाऱयावरील पोलीस हटविले
पोळे चेकनाक्यावर चाचणीच्या तसेच अन्य सुविधा तयार ठेवण्यात आलेल्या असल्या, तरी गोव्यात प्रवेश करणाऱया जंगलातील सर्व पायवाटा मुक्त आहेत. यापूर्वी बेला, मार्ली, तिर्वाळ, कल्ले या जंगलातील वाटांबरोबरच पोळे समुद्रकिनाऱयावर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या सर्वांना हटविण्यात आले आहे. पोळे चेकनाक्यावरील वैद्यकीय पथक हटविण्यात आले आहे. या ठिकाणी परराज्यांतून येणाऱया नागरिकांकडून 2 हजार रुपये घेतले जातात आणि त्यांना सरळ प्रवेश दिला जातो. चाचणीनंतर त्यांची मडगावच्या हॉटेलात रवानगी केली जाते. त्या ठिकाणी परत त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि पैसे घेतले किंवा तपासणी केली म्हणून साधा दाखला देखील दिला जात नाही, अशी तक्रार एका निवृत्त शिक्षकाने मांडली आहे. आपल्या अडलेल्या पेन्शनचे काय झाले हे तपासण्यासाठी सदर निवृत्त शिक्षक माजाळी येथून गोव्यात आले होते.
पोळेतून समुद्रमार्गे ये-जा
पोळे समुद्रकिनाऱयावर तैनात करण्यात आलेले पोलीस कधीच हटविण्यात आले आहेत. या समुद्रमार्गातून दिवसाकाठी किमान 20 ते 25 लोक ये-जा करतात, येताना मासळी आणतात आणि त्याचा व्यवहार काणकोण तालुक्यातील विविध भागांमध्ये करतात. काही जणांच्या त्या ठिकाणी मोटारसायकली पार्क करून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याद्वारे राज्यातील इतर भागांमध्ये काही जण दररोज फेरफटका मारतात अशी माहिती उपलब्ध झाली असून हे लॉकडाऊन कोणासाठी असा सवाल जो तो आता करायला लागला आहे.
आरोग्य केंद्र सज्ज : डॉ. देसाई
दुसऱया बाजूने विचार केल्यास काणकोणच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसहित सर्व कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढण्यास सज्ज आहेत. ज्या ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले त्या भागात स्वताच्या जिवाची पर्वा न करता हे कर्मचारी धावून जातात आणि संशयिताची तपासणी करतानाच त्यांना इस्पितळात पाठविण्याचे काम करतात. त्या भागातील लगतच्या सर्व नागरिकांची चाचणी करण्याचे काम करतात. आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशकाचा फवारा मारतात, अशी माहिती केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. वंदना देसाई यांनी दिली.
आतापर्यंत कोळंब, कर्वे-गावडोंगरी आणि वाल-आगोंद या ठिकाणी रुग्ण आढळले असून या भागांतील सर्व नागरिकांची चाचणी करतानाच संशयितांना आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून इस्पितळात पाठविण्यात येत आहे. या केंद्रात 108 सेवेची धरून एकूण 3 रुग्णवाहिका आहेत. नागरिकांनी कोणत्याही भागात संशयास्पद असा प्रकार आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्राला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देसाई यांनी केले आहे.