चावडीवरील मतदान केंद्र ग्रीन सेंटर, तर सादोळशे, देळे-मास्तीमळ पिंक सेटर्स, 650 कर्मचारी विविध कामांसाठी तैनात
प्रतिनिधी /काणकोण
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची संपूर्ण तयारी काणकोणच्या निर्वाचन अधिकारी कार्यालयाकडून झाली असून साधारणपणे 650 इतके कर्मचारी विविध कामांसाठी तैनात करण्यात आले आहेत. या मतदारसंघात आगोंद, श्रीस्थळ, गावडोंगरी, खोतीगाव, पैंगीण, लोलये या पंचायती आणि काणकोण पालिकेचा समावेश असून आज 14 रोजी होणाऱया मतदानात 34241 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 16690 पुरुष, तर 17551 इतक्या महिला मतदार आहेत.
क्षेत्रवार पाहिल्यास मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे-आगोंद-पुरूष 1614, महिला 1743, एकूण 3357, नगरपालिका क्षेत्र-पुरुष 4996, महिला 5336, एकूण 10332, श्रीस्थळ पंचायत-पुरुष 1978, महिला 1899, एकूण 3877, पैंगीण पंचायत-पुरुष 2803, महिला 3044, एकूण 5847, लोलये पंचायत-पुरुष 2127, महिला 2441, एकूण 4569, खोतीगाव पंचायत-पुरुष 1067, महिला 1079, एकूण 2146, गावडोंगरी पंचायत-पुरुष 2105, महिला 2008, एकूण 4113.
गावडोंगरी पंचायत वगळता सर्वच पंचायतींत आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये महिला मतदारांचे प्राबल्य आहे आणि सर्व राजकीय पक्षांनी महिलांवरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यावेळी 776 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापूर्वी 80 वर्षांवरील 264, तर दिव्यांग मतदारांपैकी 63 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत यंदा एकूण 8 उमेदवार उतरले असून भाजपाचे रमेश तवडकर, काँग्रेसचे जनार्दन भंडारी, तृणमूल काँग्रेसचे महादेव देसाई आणि अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस व विजय पै खोत या सर्वांनीच आपला विजय होईल असा दावा केला आहे.
अधिकाऱयांचे पथक सज्ज
आतापर्यंत व्यवस्थित सारी प्रक्रिया या मतदारसंघात पूर्ण झालेली असून निर्वाचन अधिकारी उदय प्रभुदेसाई, साहाय्यक मनोज कोरगावकर आणि निरीक्षक प्रमोद ना. गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप राणे, कीर्तिराज ना. गावकर, स्वप्नील देसाई, सी. सी. स्कारिचेन, धनंजय नागवेकर, लेस्टर डिसोझा, नागेश आचारी, अशोक गावस देसाई हे क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. पोळे चेकनाक्यावर येसो देसाई, दीपराज मडकईकर, कोकण रेल्वे स्थानकावर संजय गावकर. प्रदीप पागी, भिवा वेळीप देखरेख ठेवून आहेत, तर व्हिडीओ निरीक्षणाचे काम विराज नाईक करत आहेत. त्याशिवाय केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या चैत्रा एन. आणि मनीषा सेनिया सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.
एक ग्रीन, दोन पिंक सेंटर्स
या मतदारसंघातील एकूण 59 मतदान केंद्रांपैकी चावडीवरील केंद्र हे ग्रीन, तर सादोळशे आणि देळे, मास्तीमळ येथील दोन केंद्रे पिंक सेंटर्स म्हणून घोषित करण्यात आली असून या केंदांवर महिलावर्ग संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे. या तिन्ही केंद्रांवर त्या त्या विषयानुरूप आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. शिवाय सर्व मतदान केंद्रांवर सर्वसामान्य नागरिक आणि दिव्यांग व वृद्ध मतदारांसाठी खास शामियाने उभारण्यात आले आहेत. आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सर्व मतदान केंद्रांवर सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती देतानाच मतदान सुरळीतपणे आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडेल याची सर्व काळजी घेतली आहे, अशी माहिती निर्वाचन अधिकारी प्रभुदेसाई यांनी दिली.
रविवारी दुपारी भोजनानंतर काणकोणच्या सर्व मतदान केंद्रांवर अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदान साहित्य आणि त्या त्या केंद्रांवरील कर्मचाऱयांना पाठविण्यात आले. त्यापूर्वी प्रशासकीय इमारतीसमोर उभारलेल्या शामियानात निर्वाचन अधिकारी प्रभुदेसाई यांनी सर्व कर्मचाऱयांना मार्गदर्शक सूचना केल्या आणि मतदान साहित्याचे वितरण केले. यंदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची पथके प्रत्येक मतदान केंद्र तसेच मोक्याच्या स्थळी तैनात करण्यात आली आहेत.