मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार, दौऱयाच्यावेळी विविध प्रकल्पांचे उद्घाटनही होणार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणात आज 25 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रशासन आपल्या दारात उपक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जागेत हा जनता दरबार भरविला जाणार असून त्यासाठी विद्यालयाचे प्रशस्त सभागृह आणि अन्य आठ खोल्या वापरण्यात येणार आहेत.
मागच्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांची कित्येक कामे अडून पडली. त्यावर निर्णय घेऊन त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी गोवा प्रशासनातील 25 पेक्षा अधिक खात्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9.45 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालणार असलेल्या या उपक्रमात मुख्यमंत्री सावंत, काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक आणि अन्य अधिकारी उपस्थित राहतील.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसभापती फर्नांडिस सर्व गोष्टींवर अगदी बारीक लक्ष ठेऊन आहेत. काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, दिवाकर पागी, दामोदर च्यारी, पंकज ना. गावकर, रामकृष्ण ना. गावकर, प्रशांत देसाई आणि अन्य कार्यकर्ते, महिला मोर्चा व युवा मोर्चाचे कार्यकर्तेही त्याच्या तयारीत गुंतले आहेत. काणकोणचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि कृषी तसेच अन्य महत्त्वाच्या खात्यांचे कर्मचारी देखील या कामात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर उपसभापती फर्नांडिस यांनी काणकोणच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात खातेप्रमुख तसेच या उपक्रमात सहभागी होणाऱया सर्व अधिकाऱयांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा संपूर्ण कार्यक्रम
जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री अधिकाऱयांसमवेत चर्चा करून योग्य तो तोडगा काढणार आहेत. दुपारी भोजनानंतर मुख्यमंत्री सावंत श्रीस्थळ येथे उभारलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. 25 सप्टेंबर, 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
त्यानंतर चापोली येथे वनविकास प्राधिकरणाच्या नगरवन या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष असलेले उपसभपती फर्नांडिस यांच्यासहित मुख्य वनपाल पंकज अस्तोरा, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर मागच्या कित्येक वर्षांपासून आगोंद भागातील लोकांची मागणी असलेल्या धवलखाजन, बोरी येथील नवीन पुलाची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सध्या येथील पूल मोडकळीस आलेला असून नवीन पुलावर 62 लाख 51 हजार रु. इतका खर्च येणार आहे.
कटआऊट्स, फलकांच्या साहाय्याने प्रसिद्धी
मुख्यमंत्र्यांच्या काणकोण दौऱयाची माहिती संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना समजावी यासाठी ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने प्रसिद्धी करण्यात आली आहे. चार रस्ता ते शेळेरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे कटआऊट्स, फलक लावण्यात आले आहेत. संपूर्ण मतदारसंघात मोक्याच्या ठिकाणी कटआऊट्स लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ भाजपमय झाला असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. खोतीगाव, गावडोंगरी, आगोंद भागांतून येणाऱया नागरिकांसाठी खास वाहनांची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाला येणाऱया प्रत्येकाने आपले ओळखपत्र, आधार कार्ड आणि जन्मदाखल्याची प्रत आणावी, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमात माजी मंत्री रमेश तवडकर यांना कोणतेच स्थान देण्यात आलेले नसले, तरी मिळालेल्या माहितीनुसार, ते आपल्या समर्थकांसहित उपस्थित राहणार आहेत. उपसभापती फर्नांडिस यांनी देखील आपल्या समर्थकांची अधिक गर्दी कशी होईल याकडे लक्ष दिलेले आहे. त्यामुळे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन या ठिकाणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.