प्रतिनिधी / काणकोण
भारतीय जनता पक्षाच्या काणकोण मंडळातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी शनिवारी उद्घाटन केले. राजबाग येथील हॉटेल मॉलिमामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उद्घाटन सोहळय़ाला माजी मंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत, काणकोण मतदारसंघातील निरीक्षक प्रभाकर गावकर, काणकोण मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, दक्षिण गोवा सरचिटणीस सर्वानंद भगत आणि काणकोण मंडळाचे सचिव दिवाकर पागी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात नंदीप भगत यांनी स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर उपसभापती फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात पक्षसंघटनेवर भर दिला. सर्वांनी एकजुटीने काम केल्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीत यश मिळाले. तीच संघटनशक्ती येणाऱया पालिका निवडणुकीत आणि त्यापुढील निवडणुकीत दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले. या सत्राचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव दामोदर च्यारी यांनी केले, तर दिवाकर पागी यांनी आभार मानले. या प्रशिक्षण शिबिरात काणकोण मंडळाचे सदस्य, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते, विविध पंचायतींचे सरपंच, पंच, माजी नगराध्यक्षा, माजी नगरसेवक यांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला.
दुसऱया सत्रात युवा मोर्चाचे पंकज ना. गावकर, सर्वानंद भगत यांनी राष्ट्रीय सुरक्षा योजना, माजी आमदार दामोदर नाईक यांनी अंत्योदय योजनेचा मागच्या सहा महिन्यांचा आढावा आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी राज्य सरकार आणि भाजपाची कामगिरी यासंबंधी माहिती देताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी भाजपाची कार्यपद्धती आणि आयोजनाचे कौशल्य यासंबंधी मार्गदर्शन करताना भाजपाच्या आजवरच्या कारकिर्दीचा तसेच प्रगती आणि कार्यप्रणालीचा आढावा घेतला. तर नागराज प्रभू यांनी 2014 नंतरचे भारतीय राजकारण आणि आमची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले.
आज 17 रोजी सकाळच्या सत्रात माजी सभापती राजेंद्र आर्लेकर हे भारतीय विचारधारा आणि आमची विचारसरणी, दुसऱया सत्रात गुरुप्रसाद पावसकर विचार परिवार, तिसऱया सत्रात शर्मद रायतूरकर व्यक्तिमत्त्व विकास, तर शेवटच्या सत्रात भाजपाचा इतिहास आणि विकास या विषयावर पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मार्गदर्शन करतील. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या समाजमाध्यमांचा वापर या विषयावरील मार्गदर्शनानंतर या शिबिराचा समारोप होईल.