प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या सध्या 57 वर पोहोचली आहे. अत्यंत गंभीर अशी ही बाब असून याबाबतीत सतर्क राहण्याचा इशारा उपसभापती इजिदोर फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदसाई यांनी दिला आहे.
काणकोणचे मासळी मार्केट, भाजी मार्केट तसेच गोवा बागायतदार भवनामध्ये निर्बंधांचे पालन केले जात नाही, काही जण विनामास्क या ठिकाणी गर्दी करतात असे दिसून आल्यानंतर स्वतः उपसभापती फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी प्रभुदेसाई, नगराध्यक्ष सायमन रिबेलो, मामलेदार विमोद दलाल, पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी चावडीवरील गोवा बागायतदार भवनाला भेट देऊन तेथील अधिकाऱयांना इशारा दिला. सरकारने जे काही निर्बंध घालून दिलेले आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी येथील कर्मचारीवर्ग आणि ग्राहकांनाही देण्यात आल्या. सध्या काणकोण तालुक्यात जे कोरोना रुग्ण आढळले आहेत त्यात पाळोळे येथे 2, आगोंद 2, पाटणे 7, तळपण 7, तेंबेवाडा 2, मास्तीमळ 4, भगतवाडा, चार रस्ता 5, मुठाळ 1, चावडी 1, गालजीबाग 6, देवाबाग 1, कोळंब 2, शेळेर 1, पैंगीण 2 व भाटपाल येथे 1 अशी स्थिती आहे.