विकास दुबेच्या घरातून AK47, 17 काडतुसे जप्त
ऑनलाईन टीम / लखनऊ :
कानपूर पोलीस हत्याकाडांतील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शशिकांत असे आरोपीचे नाव असून, त्याच्या घरातून एक रायफल जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याच्या सांगण्यावरून गुंड विकास दुबे याच्या घरातून AK47 आणि 17 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एडीजी प्रशांत कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.
गुंड विकास दुबेला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 21 जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षकांसह 8 पोलीस शहीद झाले. या हत्याकांडातील 21 आरोपींपैकी 6 जण पोलीस चकमकीत मारले गेले. तर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. श्यामू वाजपेयी, जहान यादव, दयाशंकर अग्निहोत्री आणि शशिकांत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विकास दुबे, राजाराम, अतुल दुबे, अमर दुबे, प्रभात मिश्रा आणि प्रवीण दुबे हे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. इतर 11 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आज शशिकांत नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी 50 हजार रुपयांचे इनाम ठेवले होते. आरोपींनी पोलिसांकडून लुटलेली काही शस्त्रे बिकारू गावातून जप्त करण्यात आली आहेत.