वार्ताहर / पालये
मिर्झलवाडा-पालये येथील कान्हे परब घराण्यातील सात दिवशीय गणेशोत्सवाची काल थाटात सांगता झाली. या कुटुंबातील सुमारे 100 हून अधिक सदस्य या गणेशोत्सवात दरवर्षी एकत्रित येत असतात. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या जमान्यातही सणानिमित्त अशाप्रकारे कुटुंब एकत्रित येण्याच्या परंपरेमुळे खऱया अर्थाने समाजापुढे आदर्श म्हणावा लागेल.
शंकर तुकाराम परब, बाबली तुकाराम परब, एकनाथ तुकाराम परब, रमाकांत शांताराम परब, उदय शांताराम परब, भरत शांताराम परब, कान्होबा सदाशिव परब, दशरथ सदाशिव परब, गंगाराम सदाशिव परब, दिनकर सदाशिव परब, किसन नामदेव परब, धर्मा लवू परब, रवी अंकुश परब, हनुमंत पुंडलिक परब, सुदन लवू परब, जयवंत लवू परब आदी सोळाजणांचे कुटुंब या गणेशोत्सवात एकत्रित येतात. घुमटवादन, भजन तसेच अन्य कार्यक्रम यावेळी रंगतात. या घराण्यात गोकुळाष्टमी, नागपंचमीही मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येते.
या गणेशोत्सवात यंदा सुमारे सात फुटांची गणेशमूर्ती बनविण्यात आली होती. ही मूर्ती दरवर्षी स्वतःच्या चित्रशाळेत आम्ही बनवितो, असे या कुटुंबाचे सदस्य शंकर (सोनू) तुकाराम परब म्हणाले. या चित्रशाळेला फार मोठी जुनी परंपरा असून पालये गावात ही चित्रशाळा एकमेव ठरते. पणजोबापासून आम्ही ही मूर्तिकला जपत आलो असून चित्रशाळेत अनेक गणपती आम्ही बनवितो. सध्याची ही चौथी पिढी ठरते, असे शंकर परब म्हणाले. कामगार ठेवणे सध्याच्या काळात परवडत नसल्याने आपल्याला गणेशमूर्ती बनविण्यास कुटुंबाचा हातभार लागतो. कुटुंबाचे एक सदस्य कलाशिक्षक गंगाराम परब यांचे याकामी पूर्ण सहकार्य लाभते. तसेच आपली पत्नी भारती शंकर परब याही मूर्तीकामात हातभार लावतात, असे शंकर परब म्हणाले. दिवंगत कान्होबा परब (कान्हे) तसेच याच घराण्यातील दिवंगत बाबली परब, सदाशिव परब, धर्माजी परब, पुंडलिक परब, तुकाराम परब, नामदेव परब, शांताराम परब, अंकुश परब या जाणत्यांचा मूर्तीकलेचा वारसा आम्ही जपणार आहोत. याहीपुढे ही परंपरा आम्ही जपू, असे शंकर परब, गंगाराम परब म्हणाले.
सरकारी सेवेत असताना आपण महिनाभर रजा घेऊन चित्रशाळेत गणेशमूर्ती बनवायचो, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयातून निवृत्त होऊन अकरा वर्षे उलटली आहेत व पूर्णवेळ चित्रशाळेत कार्यरत असतो, असे शंकर परब म्हणाले. हा कलेचा वारसा आम्ही यापुढेही जपणार आहोत. 1972 दरम्यान अनेकांची आर्थिक स्थिती बेताची होती. अनेकांना गणपतीमूर्ती खरेदी करणे शक्य नसायचे. आम्ही तीन रुपये दरानेही तर काहीजणांना मोफतही गणेशमूर्ती आमच्या चित्रशाळेमधून दिलेल्या आहेत. काहींनी तांदूळ, नाचणी, कुळीद देऊनही चित्रशाळेतून गणेशमूर्ती भाविकांनी नेलेल्या आहेत. नागोबाचा दरही केवळ 25 पैसे होता. आता चित्र भरपूर प्रमाणात बदलले आहे. आम्ही आर्थिक लाभासाठी नव्हे तर जाणत्यांच्या चित्रशाळेची परंपरा जपण्यासाठी आम्ही ही मूर्तीकला जपतो आहोत, असे शंकर परब म्हणाले.
कोरोनाचे सावट असतानाही यंदाही आम्ही गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला. पूर्वी गावातील गणपती पोहचविल्यानंतर आमच्या गणपतीचे विसर्जन व्हायचे. यापुढेही हा उत्सव आम्ही एकत्रितपणे साजरा करू तसेच मूर्तीकलेचा वारसा, चित्रशाळेची परंपरा जपू, असे शंकर परब तसेच कुटुंबातील अन्य सदस्य म्हणाले.