ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काबुलमधील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. येत्या 24 ते 36 तासांत काबुल विमानतळाला दहशतवादी पुन्हा एकदा निशाणा करु शकतात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील अमेरिकन दूतावासाने अलर्ट जारी करुन, अमेरिकन नागरिकांना ताबडतोब काबूल विमानतळाच्या आसपासच्या भागातून माघारी फिरण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकन सैन्याने काबुलमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या ISIS च्या तळांवर बॉम्बचा वर्षाव केला आणि दहशतवाद्यांची अनेक तळं उद्ध्वस्त केली होती. यात हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार ठार झाला. त्यानंतर अफगाणिस्तानातील दहशतवादी गट सक्रीय झाले असून, त्यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. दरम्यान, काबुल विमानतळावरील अमेरिकन सैन्याने पुढील 24 ते 36 तासांत काबुल विमानतळावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या विमानळाजवळील दक्षिण गेट, पंजशीर पेट्रोल स्टेशनजवळील गेट आणि नवीन मंत्रालयाजवळील भागातून अमेरिकन नागरिकांना माघारी फिरण्यास सांगण्यात आले आहे.