विविध कार्यक्रमांचे आयोजन : शहरातून मशाल मिरवणूक : भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या त्यागाचे सदैव स्मरण ठेवण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कारवार
देशासाठी हुतात्मा झालेल्या भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या स्मरणार्थ कारवार जिल्हय़ातील कारवार, अंकोला, यल्लापूर, शिरसी येथे विविध कार्यक्रमांसह ‘शहीद’ दिनाचे आचरण करण्यात आले.
बलिदान दिनाचा एक भाग म्हणून येथील युवक नगरपालिकेच्या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ जमा झाले आणि भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालू आचरण केले. यावेळी बोलताना युवा नेता नागराज गौड म्हणाले, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या जीवन चरित्रातून आम्ही स्फूर्ती घेतली पाहिजे. भगतसिंहसारख्या महान सुपुत्राचे स्मरण केवळ वर्षातून एकदा करून काही उपयोग नाही. त्या महान सुपुत्रांनी केलेल्या त्यागामुळेच आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून जीवन जगत आहोत, याची आठवण आम्ही नेहमीच ठेवली पाहिजे. यावेळी विद्यार्थी नेते सागर नाईक, युथ क्लब अध्यक्ष नूतन जैन, क्षत्रिय महावक्कुटचे तालुका अध्यक्ष अभिषेक राणे, प्रीतम नाईक आदी उपस्थित होते.
भारतमातेला परकियांच्या बेडय़ातून मुक्त करण्यासाठी भगतसिंगसह अन्य भारतीय सुपुत्रांनी पेल्या त्यागाच्या स्मरणार्थ यल्लापूर भाजप युवा मोर्चातर्फे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन पालकमंत्री शिवराम हेब्बार यांचे पुत्र आणि युवा नेते विवेक हेब्बार यांनी केले. मिरवणुकीत चंद्रकला भट, गोपाळकृष्ण गावकर, उमेश भागवत, प्रशांत नायकसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा भरणा अधिक होता.
शिरसी येथे हिंदू जागरण मंचतर्फे शहीद दिन
शिरसी येथे हिंदू जागरण मंचतर्फे बलिदान दिनाचे आचरण करण्यात आले. शिवाजी चौकात जमा झालेल्या मंचच्या पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी नंदन सागर यांचे समयोचित भाषण झाले. दरम्यान कुमठा येथेही शहीद दिनाचे औचित्य साधून भाजपतर्फे मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत मोहिनी गौडा, महेश नाईक, हेमंतकुमार गावकर आदी सहभागी होते.
अंकोला येथे मशाल मिरवणूक
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून अंकोला भाजप युवा मोर्चातर्फे अंकोलानगराच्या मुख्य रस्त्यावरून मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मिरवणुकीचे नेतृत्त्व युवा नेते संजय नाईक यांनी केले. मिरवणुकीत भाजप राज्य मागासवर्गीय मोर्चा कार्यकारिणीचे सदस्य राजेंद्र नाईक, निलेश नाईक आदी सहभागी झाले होते. यल्लापूर येथेही भाजप युवा मोर्चाकडून मशाल मिरवणूक काढण्यात आली.