प्रमुख कुस्ती 67 मिनिटानंतर निकाली; खनगावात 50 हून अधिक चटकदार कुस्त्या
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
खनगाव खुर्द येथे बसवाण्णा यात्रा व गुढी पाडव्यानिमित्त प्रती वर्षाप्रमाणे आयोजित भव्य कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने दिल्लीच्या भारत केसरी जितू गुज्जर याला 67 व्या मिनिटाला एकलांगी डावावर अस्मान दाखवून उपस्थित 25 हजार कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
कार्तिक काटे दावणगेरी व जितू गुज्जर दिल्ली ही कुस्ती विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा काँग्रेसचे सभासद मृणाल हेब्बाळकर, एस. एस. फौंडेशनचे अध्यक्ष संजय सुंठकर, अष्टे ग्रा. पं. अध्यक्ष मलिकजान मुल्ला, गणपत बन्नोशी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. रात्री 8.40 वा. या कुस्तीला प्रारंभ झाला.
आठव्या मिनिटाला जितू गुज्जरने एकेरी पट काढून कार्तिकला खाली घेत एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण कार्तिकने सुटका करून घेतली. 12 व्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून जितूला खाली घेत पलटी मारण्याचा प्रयत्न केला. पण तो डाव अंगलट येवून जितूने कार्तिकवर ताबा मिळविला.
जितूने जवळपास 5 ते 6 मिनिटे घिस्सा, लाटने, धोबीपछाड, एकचाक व घुटना डावावर चित करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न कार्तिक काटेने हाणून पाडले. एक तास चाललेल्या या कुस्तीमुळे कुस्ती शौकीन नाराज झाले. त्याचवेळी जितूच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने मैदानातून माघार घेण्याचा प्रयत्न केला. पण शौकिनांनी कुस्ती पुढे चालू ठेवण्याची विनंती केल्यामुळे पुन्हा जितू कुस्ती करण्यास तयार झाला. 65 व्या मिनिटाला कार्तिक काटेने दुहेरी पट काढून जितूवर ताबा मिळविला. लाटणे डावावर फिरवून पुन्हा कब्जा मिळविला. 67 मिनिटाला कार्तिकने जितू गुज्जरला पायाची एकलांगी भरून चित करून उपस्थित कुस्ती शौकिनांना खुश केले. या कुस्तीसाठी पंच म्हणून बाळाप्पा पाटील, मारूती पाटील यांनी काम पाहिले.
बंटी हरियाणा व नागराज बस्सीडोनी ही दुसऱया क्रमांकाची कुस्ती एस. एस. फौंडेशनचे अध्यक्ष संजय सुंठकर व गणपत बन्नोशी यांच्या हस्ते लावण्यात आली. सातव्या मिनिटाला नागराज बस्सीडोणीने दुहेरी पट काढत घिस्सा मारत कुस्ती मैदानाबाहेर नेली. त्यामुळे कुस्ती पुन्हा खडाखडी सुरू करण्यात आली. 11 व्या मिनिटाला बंटीने चाट मारून नागराजला खाली घेत एकलांगी भरून चित करण्याचा प्रयत्न करत असताना पायाला दुखापत झाल्यामुळे बंटी हरियाणाला विजयी घोषित करण्यात आले.
कुस्ती आश्रयदाते सतिश पाटील, पिराजी मुचंडीकर व खनगाव कुस्तीगिर संघटनेच्या हस्ते अप्पासाहेब इंगळगी व अमोल नरळे सांगली यांच्या हस्ते तिसरी कुस्ती लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला अमोल नरळेने एकेरी पट काढीत घिस्सा डावावर नेत्रदीपक विजय मिळविला. चौथ्या कुस्तीत रंगा दावणगेरीने सुनील सांगलीचा एकेरी पट काढीत एकलांगी डावावर विजय मिळविला.
पाचव्या कुस्तीत किरण अष्टगीने सिद्धू सांगलीवर एकलांगी डावावर विजय मिळविला. सहावी कुस्ती रोहित ल. कंग्राळी व विक्रम शिनोळी व सातवी कुस्ती सुशांत ल. कंग्राळी व प्रशांत इचलकरंजी या रंगलेल्या कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आल्या. आठव्या कुस्तीत निरंजन येळ्ळूरने महादेव इटगीचा मोळी डावावर पराभव केला. नवव्या कुस्तीत रूपेश कर्लेने कुबेर पीरनवाडीवर एकलांगी डावावर विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रसाद कलखांबने श्रीकांत सांगलीचा लाटणे डावावर पराभव केला. 11 व्या कुस्तीत संकल्प ल. कंग्राळीने विक्रम तुर्केवाडीवर एकचाक डावावर विजय मिळविला. बाराव्या क्रमांकाच्या कुस्तीत दयानंद सांवगावने प्रवीण निलजीवर एकचाक डावावर विजय मिळविला.
तेराव्या कुस्तीत प्रथमेश ल. कंग्राळीने महेश मठपती आखाडा याचा झोळी डावावर पराभव केला. मेढय़ाच्या कुस्तीत सिद्धू इंगळगीने दर्शन कंग्राळीचा घीस्सा डावावर पराभव करून मेंढय़ाचे बक्षीस पटकाविले. त्याचप्रमाणे पार्थ कंग्राळी, लक्ष्मण कणबर्गी, किसन कंग्राळी, सुरज कडोली, कृष्णा तिर्थकुंडे, मयूर खनगाव, राहुल किणये, रोहिदास मठपती, चैतन्य येळ्ळूर, ओंकार मच्छे, ओम घाडी, सुनील खनगाव, मारूती खनगाव, गौतम खनगाव यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय संपादन केले.
कुस्तीचे समालोचन कृष्णा राशीवडे यांनी केले तर कुस्तीचे पंच म्हणून रामा पाटील, आयाप्पा पाटील, मारूती पाटील, गुंडू पाटील, बसवाणी सुतार, कृष्णा नाडगौडा, गणपत बण्णोशी, नवीन मुतगे, बाळाराम मुतगे यांनी काम पाहिले.