कॉटन रफ अँड टफ असलं तरी या कपडय़ांची काळजी घ्यावी लागते. कोणत्याही कार्यक्रमाची शान ठरणारे कॉटन कुर्ते असोत किंवा जीम पँट असो, हे कपडे अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांची देखभाल गरजेची आहे. तुमच्याकडेही कॉटन कुर्ते आणि जीम पँट्स असतील. त्यांच्या देखभाल कशी करायची हे जाणून घेऊ.
* कॉटन कुर्ती धुताना सौम्य डिटर्जंट वापरा. कपडे साधारण 15 मिनिटं भिजवून ठेवा. सर्व कपडे हलक्या हातांनी धुवा. तीन ते चार वेळा पाण्यातून काढा. नक्षीकाम केलेल्या कुर्त्यांवर ब्रशचा वापर करू नका.
* कॉटन कुर्ते शक्यतो हातांनी धुवा. त्यातही नक्षीकाम केलेले, चिकनकारी वर्कवाले कुर्ते वॉशिंग मशिनमध्ये धुवू नका. तसंच हे कपडे वॉशिंग मशीनच्या ड्रायरने वाळवू नका. सावलीत वाळत घाला.
* नक्षीकाम केलेले कुर्ते धुतल्यानंतर पिळू नका. पाणी काढून टाकण्यासाठी कुर्ता कोरडय़ा कपडय़ात गुंडाळून त्यावर हलक्या हातांनी दाब द्या. मग वाळत घाला.
* कॉटनची जीम पँट थंड पाण्याने धुवा. गरम पाण्यामुळे पँटच्या कापडाला सुरकुत्या पडतील. ही पँट मशीनमध्ये धुता येईल मात्र सौम्य डिटर्जंट वापरा. तसंच फार पिळू नका.
* ही पँट दोरीवर वाळत घालू नका. यामुळे पँटचा आकार बदलतो. त्याऐवजी टेबल किंवा फरशीवर पसरवून वाळवा.