श्रीनगर / वृत्तसंस्था
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ातील केरन सेक्टरमध्ये एलओसीजवळ दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत रविवारी चार जवान हुतात्मा झाले. यामध्ये लष्कराच्या तीन जवानांसह बीएसएफच्या एका जवानालाही प्राणास मुकावे लागले. तसेच यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. केरन सेक्टरमध्ये रविवारी पहाटेपासून घुसखोरांविरोधात लष्कर, बीएसएफ आणि राज्य पोलिसांनी संयुक्त व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांची घुसखोरांविरोधात जोरदार चकमक झाली. जवानांनी एलओसीवरील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत तीन घुसखोरांचा खात्मा केल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर संशयित हालचाली आढळून आल्या होत्या. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला व घटनास्थळावरून एके-47 रायफल आणि दोन बॅग हस्तगत करण्यात आल्या होत्या. माछिल सेक्टरमधील कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार हुतात्मा झाले. त्यानंतर रविवारी पहाटेपासून जवानांकडून परिसरात पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवेळी आणखी दोघांचा खात्मा करण्यात यश आले. यावेळी झालेल्या संघर्षात एका बीएसएफ जवानासह चौघांना हौतात्म्य पत्करावे लागले. तसेच अन्य दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर लष्करी इस्पितळात उपचार सुरू आहेत.