किटवाड ग्रामस्थांसह वाहनधारकांचा आरोप: संघर्ष कृती समितीकडे न्यायाची मागणी
वार्ताहर / कुदनूर
मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आलेल्या किटवाड ते ढोलगरवाडी रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप किटवाड ग्रामस्थांसह वाहनधारकांकडून केला जात आहे. वेळोवेळी सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता मक्तेदाराला पाठिशी घालत असून, या दर्जाहीन कामाकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे किटवाड ग्रामस्थांनी संघर्ष कृती समितीकडे धाव घेत याबाबत न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
किटवाड ते ढोलगरवाडी हा १५.२७३ किमीचा रस्ता ढोलगरवाडीपासून करेकुंडी, कौलगे, होसूरमार्गे किटवाड ते हंदिगणूर असा खडीकरणासह डांबरीकरण करण्यात आला असून, यामध्ये ४३ मोर्यांचे बांधकाम आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गटारीचे काम पूर्ण केले आहे. रस्त्यासाठी अंदाजपत्रकी रक्कम १००९.५३ लाख रुपये असून, काम पूर्ण करण्याची मुदत जुलै २०१९ पर्यंतची होती. मात्र, मक्त॓दार मे. देशमुख अँड कंपनी टेंभुर्णी यांनी या रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण केले नसून, ऐन पावसाळ्यात काम पूर्णत्वास नेण्याचा खटाटोप मक्त॓दार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मक्तेदाराच्या दर्जाहीन कामामुळे किटवाड ते ढोलगरवाडी दरम्यान ठिकठिकाणी रस्ता खचला असून, मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
किटवाड ग्रामस्थांचा रस्त्यासाठी लढा कायम
कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून वसलेल्या किटवाड गावाला संपर्क रस्त्यांसाठी कायम लढा द्यावा लागत आहे. कुदनूर-किटवाड, कालकुंद्री-किटवाड या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करत आंदोलनही झेडले मात्र, प्रशासनाने प्रसंगी आश्वासने देत आजतागायत चालढकल केली आहे. किटवाड ते होसूर हा रस्ता झाल्यामुळे ग्रामस्थांची काही प्रमाणात गैरसोय दूर होण्याची चिन्हे होती. मात्र, या रस्त्याचा दर्जा पहिल्याच पावसात ढासळला असल्याने ग्रामस्थांवर पुन्हा रस्त्यासाठी लढा उभा करावा लागला आहे.
संघर्ष कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा
किटवाड ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष गणेश फाटक यांनी होसूर ते किटवाड दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, रस्त्यावरील कारपेटचा थर हाताने निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित कामाचा निकृष्ठ दर्जा सुधारून रस्ता पुन्हा दूरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने जर मक्तेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.