वार्ताहर/ किणये
मलप्रभा मुंगेत्री परिसर बेळगाव दक्षिण व पश्चिम विभाग किणये या मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 34 व्या पारायण सोहळ्याची मुहुर्तमेढ शुक्रवारी रोवण्यात आली. बहाद्दरवाडी क्रॉस येथील बहाद्दरवाडी मराठी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचवडे येथील हभप धोंडीबा बोंजुर्डेकर हे होते.
प्रास्ताविक व स्वागत पारायण मंडळाचे सरचिटणीस तानाजी डुकरे यांनी केले. दि. 10 रोजी पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सात दिवस हा सोहळा होणार आहे.
यंदा कोरोना असल्यामुळे पारायण सोहळ्यामध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच येणाऱया प्रत्येक भाविकांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी केली जाणार असून सामाजिक अंतराचे भान ठेवण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी सविस्तर चर्चा करण्यात आली असून प्रशासानाच्या नियमावलींचे पालन केले जाणार आहे.
शुक्रवारी दुपारी मुहुर्तमेढ कार्यक्रम झाला. किणये येथील हभप वैजनाथ डुकरे यांच्या हस्ते मुहुर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्यमबाग येथील कृष्णा नरशेवाडकर परशराम होसुरकर, रामभाऊ संडीकर, कृष्णा गुरव, आदी उपस्थित होते. यावेळी भागातील अनेक मान्यवरांची भाषणे झाली. गेल्या 33 वर्षापासून या परिसरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्माचा जागर करण्यात येत आहे. यंदाचे 34 वे वर्ष असून पारायणाची तयारीही जोमाने करण्यात येत आहे.
मुहुर्तमेढ रोवल्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात ‘उभारीला ध्वज’ असे अभंग वारकऱयांनी म्हटले. या कार्यक्रमाला भोमाणी पाटील, विठ्ठल तळेकर, पुन्नाप्पा दळवी, मधु गुंजेटकर, रामचंद्र गुरव, मारुती पाटील, शंकर दळवी, कल्लाप्पा पाटील, दत्तू कुंभार, विष्णू कोळी, मारुती होसुरकर, विलास पाटील, सुभाष पाटील, अनिल होसुरकर रवळु पाटील, आदींसह भागातील वारकरी उपस्थित होते.
पारायणाचे अधिष्ठान ऍड. चंद्रकांत लोहार व उपअधिष्ठान नामदेव सुतार यांच्याकडे राहणार आहे. मुहुर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी काही नुतन ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन जमा खर्चाला सर्वांनी संमती दिली. या पारायण मंडळात 40 हून अधिक गावांचा समावेश आहे. यंदाही पारायण सोहळा उत्साहात पण कोरोनामुळे साधेपणाने करण्याचे ठरविण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.