कित्तूर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय : राणी चन्नम्मा स्मारक भवनची निर्मिती, राजवाडय़ाची प्रतिकृती उभारण्यात येणार
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या कित्तूर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत 10 कोटी रुपयांच्या कृती आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली आहे. कित्तूर या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यासाठी 2021-22 या वर्षातील अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी आता 10 कोटी रु. अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
सदर कृती आराखडय़ानुसार राणी चन्नम्मा स्मारक भवनची निर्मिती, चौकीमठ विकास आणि कित्तूर संस्थानच्या राजवाडय़ाची प्रतिकृती निर्माण केली जाणार आहे. याबरोबरच चन्नम्मा यांच्या समाधीस्थळाचा विकास, बेळवडी येथे मल्लम्मा यांचा पुतळा आणि ऐतिहासिक संदेश देणारे फलक बसविणे, कित्तूर संस्थानच्या कागदपत्रांचे संरक्षण आदी कामांचा कृती आराखडय़ामध्ये समावेश करण्याची निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
कित्तूर विकास प्राधिकरणाची स्थापन होऊन कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे 19 कोटी रुपये अनुदानातून 106 कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 104 कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
राणी चन्नम्मा यांच्या राजवाडय़ाच्या पुनर्निर्मितीचे काम राज्य पुरातत्व खात्याशी चर्चा करून सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी यावेळी दिली. कित्तूर आणि आसपासच्या भागातील स्मारकांच्या देखभालीसाठी आवश्यक उत्पन्न मिळविण्याची सूचनाही प्राधिकरणाला देण्यात आली. पर्यटन क्षेत्राच विकास हा दृष्टीकोन समोर ठेवून कित्तूरचा विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिली.
एम. के. हुबळीत पायाभूत सुविधा
एम. के. हुबळी येथे गंगांबिका यांच्या ऐक्य मंटपाच्या परिसरात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 1.25 कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. या अनुदानातून या परिसरात पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जातील.
कुडलसंगम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम
बागलकोट जिल्हय़ातील कुडलसंगम येथे दिल्लीतील श्री स्वामी नारायण अक्षरधामच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बसव म्युझियम निर्मितीचे काम हाती घ्या, पहिल्या टप्प्यातील काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना दिल्या. कुडलसंगम विकास मंडळाच्या प्रगती आढावा बैठकीत या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 94 कोटी रुपये खर्चातून लवकरच कामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. पुरामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या कुडलसंगम विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रातील 81 दुकानांचे दोन महिन्यांचे 2.97 लाख रुपये भाडे माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.