ऑस्ट्रेलिया ओपन : मेदवेदेव्ह, सिनर, व्हेकिक, प्लिस्कोव्हाही विजयी, शरापोव्हा, स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठून स्थानिक चाहत्यांना खुश केले. याशिवाय चौथा मानांकित डॅनील मेदवेदेव्ह, रोमानियाची सिमोना हॅलेप, राफेल नदाल, इटलीचा युवा खेळाडू यानिक सिनर, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, डोना व्हेकिक यांनीही पहिल्या फेरीच्या लढती जिंकून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. मात्र रशियाच्या मारिया शरापोव्हाचे तसेच अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफो यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
कोर्टवर अनेकदा वादग्रस्त वर्तन करणाऱया किर्गिओसने ऑस्ट्रेलियातील वणव्यात बळी गेलेल्यांच्या मदतीसाठी निधी मिळविण्याकरिता त्याने खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्याचे आता नवीन चाहते निर्माण झाले आहेत. तो कोर्टवर उतरला त्यावेळी या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले आणि त्याने त्यांना निराशही केले नाही. निकने इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोवर संघर्षपूर्ण लढतीत 6-2, 7-6 (7-3), 7-6 (7-1) अशी मात करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याची पुढील लढत फ्रान्सचा गिलेस सायमन किंवा उरुग्वेचा पाब्लो क्युवेस यापैकी एकाशी होईल. अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित मेदवेदेव्हने अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोवर 6-3, 4-6, 6-4, 6-2 अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये त्याने तीनदा टायफोची सर्व्हिस तोडली होती. टायफोने मागील वर्षी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मेदरोदेव्हची पुढील लढत जर्मनीचा डॉमिनिक कोफर किंवा स्पेनचा पेड्रो मार्टिनेझशी होणार आहे.
नदाल, सिनर दुसऱया फेरीत
जागतिक अग्रमानांकित राफेल नदालने या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करताना फक्त पाच गेम्स गमविले. त्याने बोलिव्हियाच्या हय़ुगो डेलियनचा 6-2, 6-0, 6-3 असा पराभव केला. नदालला ऑस्ट्रेलियन स्पर्धा फक्त एकदाच जिंकता आलेली आहे. 2009 मध्ये त्याने फेडररला हरवून जेतेपद मिळविले होते तर चार वेळा त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय पेंच ओपन 12 वेळा, अमेरिकन ओपन चार वेळा, विम्बल्डन दोन वेळा त्याने जिंकले आहे. अज्sा&न्टिनाचा फेडरिको डेल्बोनिस किंवा पोर्तुगालचा जोआव सौसा यापैकी एक त्याचा पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी असेल. भविष्यातील खेळाडू म्हणून पाहिल्या जाणाऱया 18 वर्षीय यानिक सिनरने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पुर्सेलचा 7-6 (7-2), 6-2, 6-4 असा पराभव केला. तिसऱया सेटवेळी पावसाचा व्यत्यय आल्याने तो लांबला होता. नेक्स्ट जेन फायनलमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरचा पराभव करून जेतेपद पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शॅपोव्हॅलोव्हला हरविणाऱया मार्टन फुक्सोविक्सविरुद्ध त्याचा दुसऱया फेरीचा सामना होईल.
हॅलेप, प्लिस्कोव्हाची आगेकूच
महिला एकेरीत चौथ्या मानांकित हॅलेपने मनगटाची संभाव्य दुखापत जेनिफर ब्रॅडीचा कडवा प्रतिकार मोडून काढत दुसरी फेरी गाठताना 7-6 (7-5), 6-1 असा विजय मिळविला. पहिल्या सेटवेळी कोर्टवर हाताच्या आधारावर पडली तेव्हा तिने मेडिकल टाईमआऊट घेतले. मनगटावर उपचार घेऊन तिने पुन्हा खेळ सुरू केला. मनगटाची दुखापत फारशी काळजी करण्याइतकी गंभीर नसल्याचे तिने नंतर सांगितले. दुसऱया फेरीत तिचा सामना ब्रिटनच्या हॅरियट डार्टशी होणार आहे. जागतिक द्वितीय मानांकित प्लिस्कोव्हाने दुसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लाडेनोविचचा 6-1, 7-5 असा पराभव केला. दुसऱया फेरीत लॉरा सीगमंड किंवा कोको व्हॅन्डेवेघ यापैकी एकीही तिचा सामना होईल.
शरापोव्हाचे आव्हान समाप्त
पाचवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया रशियाच्या मारिया शरापोव्हाला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. क्रोएशियाच्या 19 व्या मानांकित डोना व्हेकिकने तिचे आव्हान 6-3, 6-4 असे सरळ सेट्सनी संपुष्टात आणले. डोपिंग बंदीनंतर पुनरागमन केल्यानंतर शरापोव्हाला संघर्षच करावा लागला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे मागील वर्षी तिला बराच काळ टेनिसपासून दूर रहावे लागले होते.
प्रज्नेशची सुवर्णसंधी हुकली, पहिल्याच फेरीत पराभूत
भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनचे सर्बियाच्या जागतिक द्वितीय मानांकित जोकोविचविरुद्ध खेळण्याचे स्वप्न मात्र पहिल्या फेरीत संपुष्टात आले. जपानच्या वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या तात्सुमा इटोने भारताच्या या अव्वल खेळाडूचा 6-4, 2-6, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. तात्सुमाची लढत आता जोकोविचविरुद्ध होणार आहे. प्रज्नेशने सलग पाचव्यांदा ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीत खेळण्याची संधी साधली. पण जोकोविचविरुद्ध खेळण्याची त्याची सुवर्णसंधी मात्र हुकली. त्याच्या पराभवाने भारताचे एकेरीतील आव्हान समाप्त झाले. दुहेरीत दिविज शरण व आर्टेम सिटॅक यांची लढत पाब्लो कॅरेनो बुस्टा-जोआ सौसा यांच्याशी तर रोहन बोपण्णा-यासुताका उचियामा यांची सलामीची लढत 13 व्या मानांकित बॉब व माईक ब्रायन बंधूंशी होणार आहे. महिलामध्ये सानिया मिर्झा-नादिया किचेनॉक यांची लढत चीनच्या झिनयुन हान व लि झू यांच्याशी होणार आहे. सानिया मिर्झाने गेल्याच आठवडय़ात होबार्ट स्पर्धेत जेतेपद मिळविले आहे.