प्रक्रिया अधिक सुलभ बनविण्याची भाविकांची मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तानमधील कर्तारपूर मार्ग 611 दिवसांच्या अंतरानंतर बुधवारी पुन्हा खुला करण्यात आला आहे. भारतीय भाविकांच्या पहिल्या जथ्थ्याने या मार्गावरुन प्रवास करत गुरुद्वारा कर्तारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेतले. हा मार्ग साडेचार किलोमीटर लांबीचा आहे. भारतीय जथ्थ्याचे स्वागत करण्यासाठी भारतीय आणि पाकचे अधिकारी उपस्थित होते. खजूर आणि गोड भात देऊन स्वागत झाले.
16 मार्च 2020 या दिवशी हा मार्ग बंद करण्यात आला होता. तेव्हापासून भाविकांची नोंदणी बंद करण्यात आली होती. आता 1 वर्ष आणि 8 महिन्यांच्या कालांतराने भारत सरकारने तो पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुपर्व लवकरच सुरु होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शीख भाविकांना समाधान
हा मार्ग पुन्हा सुरु करण्यात आल्याने पंजाबच्या शीख समुदायामध्ये समाधानाची भावना आहे. पहिल्या जथ्थ्यातून साधारणतः 400 भाविकांनी गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. गुरुद्वारात सोय चांगली करण्यात आली होती, असा अनुभव भाविकांनी कथन केला. पहिल्या जथ्थ्याचे स्वागत करण्यासाठी पाकिस्तान गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष स्वतः उपस्थित होते. पाकमध्ये प्रवेश करण्यासाठी भाविक प्रथम डेरा बाबा नानक येथे पोहचले. त्यानंतर साऱयांना एकाचवेळी कर्तारपूर मार्गावरुन गुरुद्वारापर्यंत नेण्यात आले. त्यांची भारतात आणि पाकिस्तानमध्ये तपासणी करण्यात आली. परतल्यानंतरही भाविकांची तपासणी झाला.
कोरोना चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे
भाविकांसाठी कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. ज्या भाविकांजवळ हे प्रमाणपत्र नव्हते, त्यांना पाकमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. दिल्लीहून आलेल्या 5 शीख भाविकांपैकी दोघांना चाचणी प्रमाणपत्र नसल्याने रोखण्यात आले, असे प्रशासकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले. या चाचणी प्रमाणपत्राच्या अटीची माहिती आधीच भाविकांना देण्यात आली होती.
कोरोना नियमांचे पालन आवश्यक
पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची यात्रा करण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मास्क, सामाजिक अंतर, आणि सॅनिटायझरचा उपयोग इत्यादी नियम भाविकांना पाळावे लागले. या अटींची कल्पना त्यांना आधीच देण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांची भेट आज
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आपल्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांसह आज गुरुवारी कर्तारपूर साहिबचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱयाची व्यवस्था दोन्ही देशांच्या प्रशासनांनी पूर्ण केली आहे. गुरुवारी या मार्गावर अधिक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल, असे प्रशासनांनी स्पष्ट केले आहे.
प्रक्रिया सुलभ हवी कर्तारपूर मार्गावरुन पाकमध्ये दर्शनासाठी जाण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी अशी मागणी काही भाविकांनी केली. अद्यापही कागदपत्रांची समस्या उद्भवत आहे. तसेच कोरोनाच्या कठोर नियमांचे पालनही करावे लागत आहे. मात्र कोरोनाच्या नियमांमधून सूट देता येणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. इतर कागदोपत्री प्रक्रिया अधिक सुलभ करणे नंतरच्या काळात शक्य होईल. मात्र सध्याच्या परिस्थितीत भाविकांची संख्या आणि इतर बाबी नियंत्रणात राहतील. पहिल्या काही दिवसांच्या अनुभवानंतर नव्याने मांडणी केली जाईल, असे स्पष्ट केले गेले. पासपोर्टचीही अट काढून टाकावी अशी मागणी काही जणांनी केली.