युक्रेन विजयी होण्याच्या मार्गावर ः मंत्र्यांचा दावा
युक्रेनसोबतच्या युद्धात पुतीन यांचे सैन्य आता बॅकफूटवर आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह आता झेलेंस्की सरकारच्या नियंत्रणात आहे. रशियाच्या क्रूर हल्ल्यांदरम्यान युक्रेनचे उपसंरक्षणमंत्री हन्ना मालियरी यांनी कीव्ह क्षेत्रावर युक्रेनने पूर्ण नियंत्रण मिळविल्याचे म्हटले आहे. इरपिन, बुका, गोस्टोमेल आणि पूर्ण कीव्हला आक्रमकांपासून मुक्त करविले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
इरपिन आणि बुकावर युक्रेनच्या सैन्याने पुन्हा नियंत्रण मिळविले आहे. दोन्ही देशांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून मोठय़ा संख्येत लोक मारले गेले आहेत. 208 जणांना सामूहिक स्वरुपात दफन करण्यात आले आहे, तसेच रस्त्यांवर अनेक मृतदेह असल्याचे बुकाच्या महापौरांनी म्हटले आहे. युक्रेनच्या उत्तर भागातून रशिया मागे हटत असून तो आता पूर्व आणि दक्षिण भागावर लक्ष केंद्रीत करत असावा असे युक्रेनकडून म्हटले गेले आहे.
कीव्हच्या बाहेरील भागांमधील रस्ते आता पुतीन यांच्या रणगाडय़ांसाठी अंत्यभूमी ठरले आहेत. रशियन चिलखती वाहने देखील आता अवशेषांमध्ये रुपांतरित झाली आहेत. युक्रेनचे सैन्य आता अनेक नागरी वस्त्यांवर नियंत्रण मिळवत आहे.
अणुप्रकल्पावर नियंत्रण
बुका शहरातील सापडलेल्या मृतदेहांचे हात बांधलेल्या स्थितीत होते. शहरात एकेकाही 28 हजार लोकांचे वास्तव्य होते. रशियाचे सैन्य मागे हटल्यावर युक्रेनने चेर्नोबिल अणुप्रकल्पावर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले आहे. प्रकल्पावर राष्ट्रीय ध्वज फडकला असल्याचे युक्रेनच्या आण्विक संस्थेने सांगितले आहे.