न्यायालयाची परवानगी घेवून कारागृहात झाली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
योगीशगौडा खून प्रकरणी गेल्या 31 दिवसांपासून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्दतेत ठेवण्यात आलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची कुटुंबियांनी गुरूवारी भेट घेतली. न्यायालयाची परवानगी घेवून कुटुंबिय कारागृहात त्यांना भेटले.
गुरूवारी दुपारी विनय कुलकर्णी यांच्या पत्नी शिवलीला, मुली, मुलगा व आणखी एक नातेवाईक हिंडलगा कारागृहाबाहेर दाखल झाले. दुपारी 4 ते सायंकाळी 5 यावेळेत कुटुंबियांनी विनय कुलकर्णी यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. पतीला भेटून कारागृहातून बाहेर पडताना शिवलीला यांचे अश्रू अणावर झाले.
न्यायालयाची परवानगी घेवून कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली असून यावेळी त्यांना जेवणही देण्यात आले. विनय कुलकर्णी यांना घरचे जेवण पुरविण्यासंबंधी न्यायालयाने हिरवा कंदिल दाखविला आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कुटुंबियांनी पत्रकारांशी बोलायला नकार दिला.