विद्युत भारित तारेचा शॉक : कविलकट्टा येथील घटना : मुख्य वाहिनीला हूक अडकवून शेतीत सोडली होती तार
शेतात कणसं काढण्यासाठी गेलेला तरुणही गंभीर जखमी
वार्ताहर / कुडाळ:
शिकारीसाठी मुख्य वाहिनीला हूक अडकवून लावलेल्या विद्युत भारित वायडिंग वायरचा शॉक लागून कुडाळ-कविलकट्टा-बावकरवाडी येथील पिता-पुत्र जागीच मृत्युमुखी पडले. ही घटना बाव-भाटी येथे सोमवारी सकाळी 6.45 वाजता ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. कविलकट्टा बावकरवाडी येथील दीपक भगवान मातोंडकर (59) व भगवान दीपक मातोंडकर (29) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, तेथील उन्हाळी शेतीमध्ये कणसं काढण्यासाठी गेलेले बळवंत दशरथ परब (40, रा. बाव वरची परबवाडी) यांना प्रथम शॉक बसला. त्यांच्या पायाला गंभीर जखमा झाल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते यातून बचावले. त्यांना शॉक बसल्यानंतरच दोघांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे कविलकट्टा परिसरावर शोककळा पसरली आहे.
शिकारीसाठी अशा विविध क्लुप्त्या लढविल्या जातात. त्या काहीवेळा ग्रामस्थ व मुक्या जनावरांच्या जीवावर बेततात. तर काही वेळेला शिकारीसाठी जाणारेही त्याचे बळी ठरतात.
परब यांच्या ओरडण्यामुळे ग्रामस्थ धावले
बाव येथील वस्तीपासून साधारण एक किमी अंतरावर भाटी परिसरात तेथील ग्रामस्थ मोठय़ा प्रमाणात चवळी, मका, नाचणी आदी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. सोमवारी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास बळवंत (विनोद) परब हे तेथील आपल्या शेतात कणसं काढण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांच्या पायाला वेदना होऊ लागल्या होत्या. त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा शेतातील अन्य ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. परब यांना शॉक लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. प्रथम सतर्कता बाळगत एका ग्रामस्थाने तेथून काही अंतरावर असलेल्या डीपीमधून मुख्य कनेक्शन बंद केले. नंतर जखमी परब यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोठी दुर्घटना आली निदर्शनास
शिकारीसाठी वायडिंग वायर शेतात सोडण्यात आली होती. हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच, ते वायर कुठून सोडण्यात आली, याचा शोध घेत असताना तेथून साधारण 200 मीटर अंतरावर शेतामध्येच दीपक मातोंडकर व भगवान मातोंडकर या पिता-पुत्रांचे मृतदेह आढळले. वायडिंग वायरचा त्यांच्या पायांना स्पर्श झाल्याचे दिसत होते. त्यामुळे विजेच्या धक्क्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना निदर्शनास आली. बाव सरपंच नागेश परब, प्रमोद परब व अन्य ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. सरपंच परब यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांकडून वायर जप्त
भाटीवाडी परिसरातील अकरा केव्ही वाहिनीला बांबूच्या सहाय्याने हूक अडकवून विद्युत भारित वायडिंग वायर उन्हाळी पिकांमध्ये पसरविण्यात आली होती. सुमारे 150 ते 200 मीटर वायर त्या पीक लाभ क्षेत्रात सोडण्यात आली होती. पोलिसांनी ही वायर जप्त केली.
ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने व ओंकार पाटील यांनी पंचनामा केला. वृत्त समजताच कविलकट्टा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बाव व कविलकट्टा ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वालावलकर यांनी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
वायर शेतात कोणी सोडली?
बाव-भाटी परिसरातील जंगलमय भागात काही महिन्यांपूर्वी शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या आठ ते नऊजणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले होते. मात्र, आता शिकारीसाठीच विद्युत भारित वायर सोडण्यात आली होती. हे कृत्य कुणी केले असावे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत. पिंगुळी येथील उद्योजक राजीव बिर्जे यांच्याकडे भगवान मातोंडकर हे कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई, बहीण असा परिवार आहे.
ग्रामस्थांच्या दक्षतेमुळेच जखमीचे प्राण वाचले
बळवंत परब यांना प्रथम विद्युत भारित वायरचा तीव्र धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करताच शेतातील अन्य ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. तेव्हा परब यांना विजेचा धक्का बसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. परब यांच्या दोन्ही पायांना विद्युत भारित वायरमुळे खोल जखमा झाल्या आहेत. साधारण 20 मिनिटे ते वेदनांनी विव्हळत होते. ग्रामस्थांनी धावपळ करून तेथील विद्युत डीपीमधून वीजपुरवठा खंडित केल्यानेच परब यांचे प्राण वाचले.