बांधकाम-अश्विनी गावडे, आरोग्य-शिक्षण : अनंत धडाम, महिला-बालविकास : उषा आठल्ये : उपसभापती संध्या तेर्से
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ नगर पंचायतीच्या शुक्रवारी येथे झालेल्या विषय समिती सभापती निवडीत बांधकाम व पर्यटन समिती सभापतीपदी अश्विनी गावडे, आरोग्य-शिक्षण-स्वच्छता समिती सभापतीपदी अनंत उर्फ आबा धडाम, महिला व बालविकास समिती सभापतीपदी उषा आठल्ये व उपसभापतीपदी संध्या तेर्से यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पाणीपुरवठा, जलनि:सारण व बाजार समिती पदसिद्ध सभापतीपदी उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर, तर स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष ओंकार तेली यांची निवड करण्यात आली. भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
कुडाळ न. पं. विषय समिती सभापतींची मुदत 28 मे 2020 रोजी संपली होती. पण ‘कोविड-19’मुळे या निवड प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली होती. त्यानुसार या पदांसाठीची अधिकृत निवडणूक प्रक्रिया निवडणूक पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कुडाळ) वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आली.
व्हीडिओ कॉन्फरन्सीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे शासनाचे निर्देश असताना ही निवड जाहीर करताना सत्ताधारी उमेदवार व नगरसेवक नगरपंचायतीमध्ये उपस्थित होते. सकाळी शिवसेना गटनेते महेंद्र वेंगुर्लेकर यांनी मुख्याधिकारी गाढवे यांच्याकडे दिलेल्या यादीनुसार समित्यांमध्ये सेना सदस्यांचा समावेश करण्यात आला.
बांधकाम सभापतीपदी अश्विनी गावडे
बांधकाम व पर्यटन समिती सभापती पदासाठी अश्विनी गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक सुनील बांदेकर, तर अनुमोदन विनायक राणे यांनी दिले. सौ. गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या समितीत सुनील बांदेकर, विनायक राणे, देवानंद काळप व महेंद्र वेंगुर्लेकर या सदस्यांचा समावेश आहे.
आरोग्य सभापतीपदी अनंत धडाम
आरोग्य-शिक्षण-स्वच्छता समिती सभापती पदासाठी अनंत धडाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना सूचक साक्षी सावंत, तर अनुमोदन संध्या तेर्से यांनी दिले. या समितीत संध्या तेर्से, साक्षी सावंत, मेघा सुकी, श्रेया गवंडे या सदस्यांचा समावेश आहे.
महिला-बालविकास – उषा आठल्ये, उपसभापतीपदी संध्या तेर्से
महिला-बालविकास समिती सभापती पदासाठी उषा आठल्ये, तर उपसभापती पदासाठी संध्या तेर्से यांनी अर्ज दाखल केला. या द्वयींची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ. आठल्ये यांना सूचक संध्या तेर्से, अनुमोदन ओंकार तेली, तर सौ. तेर्से यांना सूचक ओंकार तेली, अनुमोदन सरोज जाधव यांनी दिले. या समितीसाठी विरोधी पक्षाने सदस्याचे नाव दिले नाही.
पाणीपुरवठा सभापतीपदी सायली मांजरेकर
विषय समित्यांपैकी एका समितीचे पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष असतात. त्यामुळे पाणीपुरवठा, जलनि:सारण व बाजार समिती सभापती पदासाठी उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर यांची निवड करण्यात आली. या समितीत सदस्य म्हणून सरोज जाधव, विनायक राणे, गणेश भोगटे व प्रज्ञा राणे यांचा समावेश आहे.
स्थायी समिती अध्यक्ष ओंकार तेली
न. पं. अधिनियमानुसार स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष ओंकार तेली यांची निवड करण्यात आली. विषय समित्यांचे सभापती या समितीचे सदस्य असणार आहेत. नूतन पदाधिकाऱयांचे अभिनंदन करण्यात आले. या निवडणूक प्रक्रिये दरम्यान नगरसेवक विनायक राणे, राकेश कांदे, सुनील बांदेकर, सरोज जाधव व साक्षी सावंत उपस्थित होत्या.
भाजपच्यावतीने अभिनंदन
नूतन पदाधिकाऱयांचे भाजपच्यावतीने तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई, सरचिटणीस विजय कांबळी, जिल्हा चिटणीस बंडय़ा सावंत, शहर अध्यक्ष राकेश कांदे, राजू बक्षी, अविनाश पाटील आदींनी अभिनंदन केले.
विरोधकांना महिलांच्या प्रश्नांची काळजी नाही!
विरोधकांनी सर्व विषय समित्यांमध्ये आपले सदस्य दिले. मात्र, महिला-बालकल्याण समितीमध्ये सदस्य दिला नाही. तो सदस्य देणे गरजेचे होते. त्यांना महिलांच्या प्रश्नांची काळजी नसावी. त्यांनी नाव न दिल्याने सदस्यपद रिक्त राहिले, असा टोला नगराध्यक्ष तेली यांनी लगावला.