मध्यरात्रीनंतरची घटना : सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे असल्याचे स्पष्ट : भरवस्तीत घटना
व्यापारी-नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ शहरातील गांधीचौक परिसरातील सहा दुकाने चोरटय़ांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर फोडल्याची घटना शनिवारी निदर्शनास आली. यात हाती मिळालेली किरकोळ चिल्लर त्यांनी लंपास केली. सीसीटीव्ही फुटेज तपासणीत तीन चोरटे असल्याचे स्पष्ट झाले. बसस्थानकानजीक भरवस्तीच्या ठिकाणी चोरटय़ांनी हे धाडस केल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची नोंद पोलिसांत नव्हती.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर गांधीचौक परिसरातील मुख्य रस्त्यानजीक असलेल्या एका हॉटेलचे दर्शनी शटर चोरटय़ांनी मधून कटावणीच्या सहाय्याने वाकवून वर उचलले. हॉटेल मालक शनिवारी पहाटे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता, ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत नजीकच्या नागरिकांना कल्पना दिली. त्यानंतर त्या हॉटेलसह तेथील गल्लीतील लॉटरी गेमचे दोन गाळे, एक ब्युटिपार्लर, बँगल स्टोअर्स व बेकरीही चोरटय़ांनी फोडल्याचे निदर्शनास आले.
हॉटेल, बेकरीतील चिल्लर लंपास
हॉटेल व बेकरीतील चिल्लर चोरटय़ांनी लंपास केली. चार दुकानांच्या दर्शनी भागाचे शटर कटावणीने मधून एक ते दीड फूट वाकविली आणि आत प्रवेश केला, तर बेकरीच्या मागील दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला. तेथील दोन दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात तीन चोरटे असल्याचे दिसत आहेत.
पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी
घटना समजताच कुडाळ पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित व्यावसायिकांकडून माहिती घेतली. परंतु दुकान व्यावसायिकांनी आपली तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. शटर वाकवून त्यातील एक चोरटा आतमध्ये प्रवेश करतो. अन्य दोघे बाहेर असल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याची चर्चा होती.
चोरटय़ांचा शहरात पुन्हा शिरकाव
कुडाळ बसस्थानकानजीकची ही घटना आहे. जी दुकाने फोडली त्यापासून काही अंतरावर नागरिक राहतात. शहरातील मुख्य रस्ताही लगत आहे. पोलिसांची गस्त असते. गुरखाही कार्यरत असतो. मात्र, चोरटय़ांनी चोरीचे धाडस केल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुडाळ शहरात चोरटय़ांनी पुन्हा शिरकाव केल्याने पोलिसांसमोर आव्हान आहे.
थंडपेय-केकवर मारला ताव
गल्लीतील काळोखाचा फायदा घेऊन साधारण पाऊण ते एक तास चोरटय़ांचा वावर बिनधास्तपणे तेथे सुरू होता. बेकरीतील खण उघडून आतील चिल्लर लंपास केली. मात्र, एवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर आतील थंडपेय व केकवर त्यांनी ताव मारला.