कुडाळ / प्रतिनिधी-
कुडाळ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजितकुमार बाळकृष्ण पाटील ( ४२ ,सध्या रा.कुडाळ – कुडाळेश्र्वरवाडी , मूळ रा.वाळवा – सांगली ) यांनी रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने कुडाळ पोलिस ठाण्यासह सिंधुदूर्ग पोलीस दलात शोककळा पसरली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून घरगुती कारणातून त्यानीं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अजितकुमार पाटील सहा वर्षापूर्वी पोलीस दलात रुजू झाले होते. जिल्हा पोलीस मुख्यालयात सेवा बजावल्या नंतर गेली तीन वर्षे ते कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
काल ते पालकमंत्र्यांसाठी नेमलेल्या बंदोबस्तामध्ये ड्युटीवर होते. ड्युटी संपवून ते नंतर आपल्या फ्लॅट वर गेले आणि ९.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी लागलीच त्यांना पडवे येथील खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.