बेशिस्त वर्तणुकीमुळे प्रांताधिकाऱ्यांची कारवाई
कुपवाड़ / प्रतिनिधी
बेशिस्त वर्तणुकीसह विविध तक्रारी वाढू लागल्याने वादग्रस्त ठरलेल्या कुपवाड़ तलाठी कार्यालयातील कुपवाड़ एकचा तलाठी किरण राजेंद्र कवाळे याच्या विरोधात मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी व अप्पर तहसिलदार यांच्या आदेशानुसार मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी ही कारवाई केली. याशिवाय तलाठी किरण कवाळे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही वरिष्ठानी दिले आहेत.
कुपवाड़ तलाठी कार्यालयातील तलाठी किरण कवाळे यांच्याविरोधात असंख्य तक्रारी वाढल्या होत्या. कवाळे हे नागरिकांच्या कामाला प्राधान्य देत नसत. दिलेल्या दस्तांच्या नोंदी घालत न्हवते. सर्वसामान्य नागरिकांना लागणारे विविध उतारे व दाखले वेळेवर देत न्हवते. याशिवाय नागरिकांचे फोन उचलत नाहीत, नागरिकांना महसूली कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. तसेच कवाळे हे एजंटांमार्फ़त आलेली कामे वेळेवर करत होते, अशा विविध तक्रारीचे निवेदन माजी आमदार प्रा.शरद पाटील, कुपवाड़ शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी जिल्हाधिकारी व अप्पर तहसीलदार सांगली यांच्याकडे दिले होते.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहुन अप्पर तहसीलदार डॉ. पाटील, नायब तहसीलदार उमेश कोळी व इतर पाच तलाठी यांनी कुपवाड़ तलाठी कार्यालयात रखडलेल्या नोंदी मार्गी लावण्यासाठी मंडल स्तरावर मेळावा आयोजित केला होता. त्यानंतरही तलाठी कवाळे यांच्या विरोधात तक्रारी वाढल्या होत्या. तसेच मिरज तहसील कार्यालयात शासनाचा तलाठी यांच्याकडे असलेला लॅपटॉप व डीएसच्या माध्यमातून स्वत:च नोंदी घालत असल्याचा प्रकार उघड़किस आला होता. या सर्व बाबींचा विचार करून प्रांताधिकारी यांनी कवाळे यांना मंगळवारी निलंबित केले. दरम्यान, या कारवाईमुळे कुपवाड़मधील नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.