प्रतिनिधी / घाटकोपर
लोकमान्य टिळक टर्मिनस वरून आपल्या सासुरवाडी मध्य प्रदेशाला जाण्यास निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी चार जणांनी बलात्कार करून तिचे पैसे आणि दागिने देखील लुटल्याची घटना काल ( दि 20 ) रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी आरोपी सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले यांना अटक करण्यात आले आहे.
पीडित महिला ही रात्री 11 वाजताच्या दरम्यान कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात असताना साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली. त्या ठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे उभे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडत असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी देखील या महिलेवर बलात्कार केला. तसेच पिडीत महिलेचे रोख रु. 3000 आणि मंगळसूत्र खेचून घेवून पळून जात होते.
यावेळी रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांच्या मदतीने दोन आरोपींना लागलीच अटक केले. तर आज पहाटे दोन आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .मात्र बारा तासाच्या आतच पोलिसांनी या चारही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.