इस्लामाबाद / वृत्तसंस्था
कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी भारताला वकिलाची नियुक्ती करण्यासाठी आणखी एक संधी द्यावी, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला शुक्रवारी दिले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या दोषी आणि त्यांना सुनावलेल्या शिक्षेचे पुनरावलोकन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाने भारताला 13 एप्रिलपर्यंत कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्यास सांगितले. 51 वषीय निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. नुकत्याच येथे झालेल्या फेरविचार सुनावणीदरम्यान पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल खालिद जावेद खान यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भारताला जाधव यांच्यासाठी 13 एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यास सांगितले.
जाधव यांना कॉन्सुलर ऍक्सेस न दिल्याबद्दल भारताने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती आणि जाधव यांच्या शिक्षेला आव्हान दिले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्चित करण्यास सांगितले. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2020 मध्ये मुख्य न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला, न्यायमूर्ती अमीर फारुक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्या तीनसदस्यीय मोठय़ा खंडपीठाची स्थापना केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने जाधव यांना त्यांच्या शिक्षेविरुद्ध पुनर्विलोकन अपील दाखल करण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा केला. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय न्यायालय (पुनरावलोकन आणि पुनर्विचार) कायदा 2021 ने जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची आवश्यकता असलेल्या पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे उच्च न्यायालयात त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची परवानगी दिली होती.