ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले सनदी अधिकारीकुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये इस्लामाबाद सर्वोच्च न्यायालयाने तीन ज्येष्ठ वकिलांची न्यायमूर्ती मित्र म्हणून नियुक्ती केली आहे.
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अबीद हसन मंटो, हमीद खान व पाकिस्तानचे माजी ॲटर्नी जनरल मकदूम अली खान या तिघांची कायदेशीर मदतीसाठी न्यायमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुलभूषण यांना वकील नेमण्याची भारताला एक संधी देण्याचा आदेशही इस्लामाबाद न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिला आहे. पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतार मिनल्ला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सध्या सुनावणी सुरू आहे. कुलभूषण यांच्यावरील याचिकेची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी विस्तारित खंडपीठासमोर होणार आहे.