वृत्तसंस्था/ टोकियो
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱया कॅनडाच्या जलतरण संघाचे कोरोना महामारीच्या भीतीने जपानमधील ऑलिम्पिकपूर्व सराव शिबिर रद्द करण्यात आल्याचे वृत्त जपानच्या क्योडो या वृत्तसंस्थेने शुक्रवारी प्रसिद्ध केले आहे.
कॅनडाच्या या जलतरण संघामध्ये सुमारे 60 जलतरणपटू आणि प्रशिक्षक वर्गाचा समावेश होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी त्यांच्यासाठी शेवटचे सराव शिबिर जपानमध्ये घेण्याचे ठरले होते. दरम्यान कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेमध्ये सध्या जपानमध्ये काही नवे रुग्ण आढळत असल्याने टोकियो व जपानमधील इतर काही शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. टोयाटो शहरामध्ये कॅनडाच्या जलतरण संघासाठी निवासाची सोय करण्यात येणार होती. कोरोना महामारी समस्येमुळे आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवरही साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. 23 जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा कदाचित लांबणीवर पुन्हा टाकली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि टोकियो ऑलिम्पिक समिती सदस्यांची तीन दिवसांची बैठक शुक्रवारी केवळ एका दिवसातच संपविण्यात आली. या बैठकीत ऑलिम्पिक पूर्वतयारी संदर्भात तसेच कोरोना परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली.