43 वर्षांपासून बंद होती शाळा
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडातील सर्वात मोठय़ा वसतिशाळेच्या मैदानात 215 मुलांचे अवशेष जमिनीत सापडले आहेत. यातील काही मुलांचे वय केवळ 3 वर्षे होते. 1978 मध्ये बंद पडलेल्या कमलूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कुलचे हे विद्यार्थी होते. 43 वर्षांनी झालेल्या या खुलाशानंतर व्हॅंकुव्हर आर्ट गॅलरीच्या पायऱयांवर या 215 मुलांच्या स्मरणार्थ 215 बुटांच्या जोडय़ा ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
1863 ते 1998 पर्यंत कॅनडात चर्चकडून चालविल्या जाणाऱया वसतिशाळा व्यवस्थेत मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले जात होते. सुमारे 1.50 लाख मुलांसोबत बलात्कार, शारीरिक शोषण, छळाशी संबंधित प्रकरणेही समोर आली होती. 4,100 मुलांचा मृत्यू याच कारणांमुळे झाला होता.
मुलांचे अवशेष मिळण्याचे हे वृत्त मनाला हादरा देणारे आहे. हा आमच्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा कलंक असल्याचे उद्गार पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काढले आहेत.
शाळेच्या मैदानावर आणि परिसरात शोध अद्याप घ्यायचा असल्याने आणखीन मृतदेह सापडू शकतात. कमलूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कुलच्या दस्तऐवजांमध्ये या मुलांचा कुठलाच उल्लेख करण्यात आला नव्हता असे ब्रिटिश कोलंबियाच्या सॅलिश भाषा बोलणाऱया फर्स्ट नेशन समुहाच्या प्रमुख रोसेन कॅसमिर यांनी म्हटले आहे.
19 व्या शतकापासून 1970 पर्यंत फर्स्ट नेशनच्या दीड लाखांहून अधिक मुलांना त्यांना कॅनेडियन समाजात स्वीकारण्याच्या कार्यक्रमादाखल सरकारकडून निधीप्राप्त ख्रिश्चन शाळांमध्ये शिकावे लागत होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना भाग पाडले जात होते आणि मातृभाषेचा वापर करू दिला जात नव्हता.
ट्रूथ अँड रिकॉन्सिलिएशन कमिशनने 5 वर्षांपूवीं संस्थेत मुलांसोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल विस्तृत अहवाल मांडला होता. गैरवर्तन आणि बेजबाबदारपणामुळे किमान 3200 मुलांचा मृत्यू झाल्याचे यात म्हटले गेले होते. कॅनडाच्या सरकारने 2008 मध्ये संसदेत याप्रकरणी माफी मागत शाळांमध्ये शारीरिक तसेच लैंगिक शोषण झाल्याची बाब मान्य केली होती.