सुधीर तुपेकर यांची लागली वर्णी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट निवडणूक होण्यास विलंब असल्याने अधिकारी आणि नागरिकांतून एका सरकारनियुक्त सदस्याचा समावेश प्रशासकीय कारभारात करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर सरकारने सदस्याची नियुक्ती केली असून सुधीर तुपेकर यांची नियुक्ती झाली आहे. तिसऱया टप्प्यात 17 कॅन्टोन्मेंट बोर्डच्या प्रतिनिधींची निवड केली असून याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत जुलैमध्ये संपली आहे. सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून निवडणुकीबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. लोकनियुक्त सभागृहाला दोनवेळा प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे तिसऱयांदा मुदतवाढ देण्यात आली नाही. कोरोनामुळे आणि कॅन्टोन्मेंट कायद्यात नव्या तरतुदीमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डवर अध्यक्ष म्हणून कमांडंट अधिकाऱयांची आणि सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या समस्या मांडण्याकरिता नागरिकांमधून एका प्रतिनिधीची निवड करण्याचा आदेश संरक्षण खात्याने बजावला आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंटकरिता सरकारनियुक्त सदस्याची नेमणूक करण्याकरिता पुणे सदर्न कमांडंटच्यावतीने अर्ज मागविण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट परिसरातून 12 नागरिकांनी अर्ज केले होते. सदर अर्ज कॅन्टोन्मेंट बोर्डने पुणे सदर्न कमांडंट यांना पाठविले होते.
देशातील विविध कॅन्टोन्मेंटमध्ये नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सरकारने दोन टप्प्यात नियुक्ती केली होती. पण बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या सदस्याचा समावेश करण्यात आला नव्हता. प्रतिनिधी नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. संरक्षण खात्याने तिसऱया टप्प्यात देशातील 17 कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डकरिता सुधीर तुपेकर यांची नियुक्ती झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुधीर तुपेकर यांनी 2014 च्या निवडणुकीवेळी वॉर्ड क्रमांक 7 मधून निवडणूक लढविली होती. पण प्रशासकीय राजवटीत त्यांची सरकारनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढील निवडणुका होईपर्यंत सरकार नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.