नवी दिल्ली
कॅस्ट्रोल इंडियाने मार्चला संपलेल्या तिमाहीत दमदार नफा नोंदवण्याची किमया साधली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 95 टक्के वाढत 243.6 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत हा नफा 125.2 कोटी रुपये नोंदला गेला होता. सदरच्या नफ्याच्या बातमीनंतर कॅस्ट्रोल इंडियाच्या समभागात शेअर बाजारात 7 टक्के इतकी उसळी दिसून आली. कंपनीचा महसूलही 66 टक्के वाढ दर्शवत 1 हजार 138 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत 688 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. आर्थिक व्यवसायाची गाडी रुळावर आल्याने कॅस्ट्रोलच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे.