प्रतिनिधी /पणजी
गोव्यातून केंद्र सरकारला देण्यात आलेल्या विविध करांचा परतावा अर्थात वाटा म्हणून केंद्राने गोवा राज्याला सुमारे रु. 450 कोटी मंजूर केले आहेत. केंद्राने दिलेल्या या कराच्या वाटय़ाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले असून त्यामुळे गोव्याच्या विविध क्षेत्रातील व स्तरातील विकासाला चालना मिळणार असल्याचे म्हटले आहे.
राज्यात विविध प्रकारचे प्रकल्प आणि विकासकामे मोठय़ा जोमाने सुरु असून काही ठिकाणी निधी कमी पडत असल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. त्या कामांना या निधीमुळे संजिवनी मिळणार असून ती लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. गोवा हे पर्यटनाचे राज्य असल्यामुळे या राज्यातून केंद्राला मोठय़ा प्रमाणात कर लाभ होतो. गोव्यात परदेशी पर्यटकही मोठय़ा प्रमाणात येत असतात. त्यामुळे परकीय चालनातूनही मोठा कर केंद्राला जातो. त्याचा परतावा गोव्याला सातत्याने मिळत असून केंद्राने सर्व राज्यांना हा परतावा बहाल केला आहे. लहान राज्यांची तुलना केल्यास गोव्याला चांगला कर परताव्याचा लाभ झाला आहे.
राज्याचे जीएसटी संकलन वाढले असून या सर्व निधीचा वापर विविध विकासकामांसाठी होणार आहे. या कर परताव्याचा निधी सर्व प्रमुख खात्यांना वाटून देण्यात येणार असून जास्तीत जास्त निधी साधनसुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निधीमुळे रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.