कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने निर्णय
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱयांना सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात येण्यास सांगितले आहे. कार्मिक मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. यापूर्वी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची अनुमती देण्यात आली होती. आता नव्या आदेशाद्वारे ज्या अधिकारी व कर्मचाऱयांचे घर कंटेनमेंट झोनमध्ये येते त्यांना सूट देण्यात येईल. कंटेनमेंट झोनमध्ये येईपर्यंत त्यांना कार्यालयात येण्यापासून सूट मिळेल. कंटेनमेंट झोन संपल्यानंतर या कर्मचाऱयांना पुन्हा कार्यालयात यावे लागेल. हजेरीसह बायोमेट्रिक हजेरी आणि कॅन्टीनसंबंधीही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय राजधानीसह देशभरात सक्रिय कोरोना प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.