केजरीवाल सरकारचा 8 वा अर्थसंकल्प सादर
ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज विधानसभेत दिल्लीचा अर्थसंकल्प सादर केला. भविष्यातील दिल्लीचं चित्र या अर्थसंकल्पात दिसतंय. ७५ हजार ८०० कोटींच्या या बजेटला सरकारने रोजगार बजेट असे नाव दिले आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्याकडं दिल्लीच्या अर्थ मंत्रालयाचीही जबाबदारी आहे, त्यामुळं त्यांनी बजेट सादर केलं. सोदियांनी त्यांच्या भाषणात येत्या ५ वर्षांमध्ये २० लाख नोकऱ्या देणार असल्याचे घोषित केले आहे.
दरम्यान, सिसोदिया दिल्लीचा बजेट सादर करण्यासाठी लाल टॅब घेऊन विधानसभेत पोहोचले होते. अर्थसंकल्प सादर करताना मनीष सिसोदिया म्हणाले, गेल्या वर्षी आप सरकारनं देशभक्तीपर अर्थसंकल्प सादर केला होता, यावेळी आमचा अर्थसंकल्प रोजगाराचा अर्थसंकल्प आहे. येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना 20 लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. आम्ही सादर करत असलेला हा 8 वा अर्थसंकल्प आहे, असे ते म्हणाले.
सिसोदियांनी राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या ७ अर्थसंकल्पनांमुळे दिल्लीतील शाळा चांगल्या सुधारल्या आहेत. तसेच मेट्रोचाही विस्तार झाल्याचे सिसोदियांनी यावेळी सांगितले. गेल्या सात वर्षात १.८ लाख सरकारी रोजगारात ५१,३०७ सरकारी निकऱ्या देण्यात आल्या आहेत. विद्यापीठात २,५००, हॉस्पिटलमध्ये ३०००रोजगार तसेच सॅनिटेशन अँड सिक्युरिटीमध्ये ५० हजार रोजगार देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
अर्थसंकल्पात दिल्ली फिल्म पॉलिसीवर बरेच काम करण्यात आले आहे. तरुणांना त्यामुळे रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. राज्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. रिटेल सेक्टर, फूड अँड बेव्हरेज, ट्रॅव्हल अँड टुरिझम, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, मनोरंजन, बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट आणि ग्रीन एनर्जीमध्ये रोजगार देण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. तरुणांना रोजगार दिला तर ते खर्च देखील करतील. त्यामुळे विक्री वाढेल तसेच विकासही होईल, असे सिसोदिया म्हणाले.