वृत्तसंस्था / मलप्पूरम, केरळ
अटीतटीने लढल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान केरळने पेनल्टी शूटआऊटमध्ये पश्चिम बंगालचा 5-4 असा पराभव करून 75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले.
केरळने सातव्यांदा संतोष करंडक पटकावला असून 1993 नंतर मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी प्रथमच हा करंडक मिळविला आहे. पश्चिम बंगालने 46 व्या वेळी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यांनी आतापर्यंत विक्रमी 32 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पण यावेळी त्यांना त्यात भर घालता आली नाही. केरळने अलीकडे प.बंगालवर वर्चस्व गाजवले असून ते या लढतीतही कायम राहिले. पहिल्या फेरीतही केरळने प. बंगालला हरविले होते आणि 2018 संतोष करंडकच्या अंतिम फेरीतही त्यांना नमविले होते. तो सामनाही निर्धारित वेळेत बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाली झाला होता.
जादा वेळेतील पहिल्या सत्रात प.बंगालने प्रथम आघाडी घेतली. दिलीप ओरॉनने हा गोल नोंदवला. सुप्रिया पंडितने पुरविलेल्या अचूक क्रॉसला विंगर दिलीपने डाईव्ह मारत हेडरने चेंडूला गोलजाळय़ाची दिशा देत हा गोल नोंदवला. सूर मारणाऱया मिधूनला हा गोल वाचवण्यासाठी काहीही करता आले नाही. आघाडी घेतल्यानंतर प.बंगालने बचावावर भर देण्याचे धोरण ठेवले. त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्नच केला नाही किंवा चेंडू आपल्या ताब्यात जास्त वेळ ठेवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांचा हा अतिसावध पवित्रा केरळला फायदेशीर ठरला. त्यांच्या नौफाल पीएनने पुरविलेल्या अप्रतिम क्रॉसला बदली खेळाडू बिबिन अजयनने गोलजाळय़ात अचूक धाडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
दोन्ही संघांची बरोबरी झाल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी गोलरक्षकांना बदलले. प.बंगालच्या सजल बागने पेनल्टी हुकवल्याने केरळला त्यात 5-4 असा विजय मिळाला. या विजयानंतर समर्थक शौकिनांनी आतषबाजी करून जेतेपदाचा आनंद साजरा केला.