सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
केरी येथील श्री विजयादुर्गा संस्थानमध्ये महाशिवारात्री उत्सवानिमित्त कुंडई येथील श्रीकृष्ण सांस्कृतिक संस्थतर्फे सादर करण्यात आलेला ‘भक्तीरंग’ हा नाटय़ आणि भक्तीसंगीताचा कार्यक्रम रंगतदार ठरला. उपस्थित श्रोत्यांना कार्यक्रमाला मोठय़ा संख्य़ेने उपस्थिती लावून कलाकारांना दाद दिली.
कुडाळ येथील सारेगम फेम प्रसन्न प्रभू तेंडोलकर यांनी ‘गंगाधरा जय शंकरा’, ‘नाम तुझे बरवे गा शंकरा’, ‘राम रंगी रंगले’, नंदाचा मूल खोटा गे’ आदी गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. तनीषा मावजेकर हिने ‘नाथ हा माझा मोही’ पद्मनाथा नारायणा’, ‘हे सूरानो चंद्र व्हा’ व ‘सोहम हर डमरू बाजे’ ही नाटय़गीते गाऊन श्रोत्यांकडून दाद मिळवली. दुर्गाकुमार नावती यांनी ‘विलसत शुभांगना’, ‘बोधा या न काय’, ‘हरी ॐ तत्सत इति’ तसेच ‘कैवल्याचा चांदण्याला’ ही भैरवी गाऊन कार्यक्रमाची उंची वाढविली. नावती यांनी मार्मिक निवेदन करून प्रत्येक गाण्याबद्दलची माहिती कथन केली. अनय घाटे यांनी ऑर्गनवर तर रुद्राक्ष वझे यांनी तबल्यावर साथसंगत केली. डॉ. दत्ताराम देसाई व प्रदीप जठार यांच्याहस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष आनंद देसाई यांनी स्वागत केले. सकाळी अभिषेक, नैवेद्य, शतकलशार्चन आदी धार्मिक विधी पार पडले.