बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी केवळ मोदी लाट पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकत नाही. मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, परंतु राज्यात निवडणूक जिंकायची असेल तर पक्षाला विकास कामे करावीच लागतील, असं मत येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी बेंगळूरमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपने आतापासूनच निवडणुकांची तयारी करत आहे.
येडियुरप्पा यांनी “पंतप्रधान मोदी केंद्रात खूप काम करत आहेत. पुढील निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान होतील. पण राज्यातील काँग्रेसला जाग आली आहे. विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे आपण अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. बूथ स्तरापासून पक्षबांधणी करायला हवी, तरच आपण काँग्रेसला धडा शिकवू शकतो. तसेच हानेगल आणि सिंदगी मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे,” असंही येडियुरप्पा म्हणाले.