माळमारूती चषक क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी/बेळगाव
युनियन जिमखाना येथे माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित माळमारूती चषक आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने ब्लू स्टार संघाचा 141 धावानी तर ऍडव्होकेट संघाने माळमारूती संघाचा 18 धावानी पराभव करून प्रत्येकी 3 गुण मिळविले. वासिम धामणेकर, प्रशांत लायंदर (के. आर. शेट्टी), बसवराज (ऍडक्होकेट) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने 20 षटकात 4 बाद 197 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 2 षटकार, 10 चौकारासह 88, सलमान जी.ने 1 षटकार, 6 चौकारासह 41, नागेंद्र पी. ने 4 चौकारासह 21 धावा केल्या. ब्लू स्टारतर्फे किशोरने 34 धावात 2, सागरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्लू स्टार संघाचा डाव 12.4 षटकात 56 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. के. आर. शेट्टीतर्फे वासीम धामणेकरने 15 धावात 6 तर जावेदने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात ऍडक्होकेट संघाने 20 षटकात 7 बाद 160 धावा केल्या. त्यात बसवराज जे.ने 1 षटकार, 9 चौकारासह 68, जी. एम. जाधवने 27 धावा केल्या. माळमारूतीतर्फे किरणने 22 धावात 3, शुभमने 26 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल माळमारूती संघाने 20 षटकात 7 बाद 142 धावाच केल्या. त्यात शुभमने 1 षटकार, 8 चौकारासह 55, भावती पी.ने 2 षटकार, 2 चौकारासह 30, विनोद टी.ने 1 षटकार, 2 चौकारासह 24 धावा केल्या. ऍडव्होकेटतर्फे संतोष बी.ने 17 धावात 2 तर सुनील सक्रीने 25 धावात 2 गडी बाद केले.