बेंगळूर/प्रतिनिधी
केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटी (केपीसीसी) कार्यालयात झालेल्या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांनी राज्य सरकारच्या प्रशासकीय अपयशाला लक्ष्य केले आणि कोरोना संसर्ग रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं म्हंटल आहे.
परिस्थिती हाताळण्यात अपयश
केपीसीसीचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंद्रे यांनी, गेल्या चार महिन्यांनंतरही सरकारकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्पष्ट आराखडा नसून ज्यांना संक्रमण थांबविण्याचे काम सोपविण्यात आले होते ते मंत्री दररोज परस्पर विरोधी विधाने करीत आहेत. लॉकडाऊनच्या विविध टप्प्यावर, साथीच्या उपचाराची तयारी करण्यासाठी शासनाकडे पुरेसा वेळ होता पण तो वापरला गेला नाही. आता अचानक झोपेतून सरकार जागे झाले आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सरकारचे कारनामे उघडकीस
माजी मंत्री एच.के.पाटील यांनी, विरोधी पक्ष सरकारचे कारनामे उघडकीस आणत असताना सरकारला धक्काबसत आहे. विरोधी पक्षांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी मंत्री इतर बाबींमध्ये लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना बीबीएमपी आयुक्तांची बदली करण्यास भाग पाडले आहे.असा निशाणा त्यांनी यावेळी साधला.
उपकरणे खरेदीत भ्रष्टाचार
केपीसीसीचे कार्यकारी अध्यक्ष सलीम अहमद यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केलेल्या आरोपाचा पुनरुच्चार करत राज्य सरकारने वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे पीपीई किट आणि व्हेंटिलेटर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे म्हंटले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके. शिवकुमार यांनी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील बेड वापरण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला.