प्रतिनिधी / चिपळूण
कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीतून तब्बल 450 कोंबडय़ा चोरीस गेल्याप्रकरणी सोमवारी सभापती धनश्री शिंदे यांनी अधिकाऱयांच्या उपस्थितीत पोल्ट्रीला भेट देत चौकशी केली. यावेळी त्यांनी उपस्थित परिचरांचे जबाब घेतले. दरम्यान जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानेही या चोरीची दखल घेत अधिकाऱयांकडून माहिती मागवली आहे.
ऑनलाईन झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत पोल्ट्रीतून 450 केंबडय़ा चोरीस गेल्या असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात पंचायत समितीमध्ये अधिकाऱयांकडून माहिती घेत प्राथमिक माहिती घेण्यात आली. याचदरम्यान सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एम. टी. करावडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीला केवळ पाच महिने शिल्लक राहिलेले असल्याने चोरीचा फटका विनाकारण आपल्याला बसू नये म्हणून पदरचे दीड लाख रूपये पोल्ट्रीच्या खात्यात भरले असल्याचे कबूल केले. त्यानुसार सभापती शिंदे या पुढील चौकशी करत आहेत.
यासंदर्भात सोमवारी सभापती शिंदे यांनी दुपारी पोल्ट्रीमध्ये जाऊन पहाणी करत अधिकाऱयांकडून पुन्हा माहिती घेतली. यावेळी उपस्थित असलेले परिचर ए. बी. पवार, विकास जाधव या दोघांचे जबाब नोंदवले. यामध्ये या दोघानी सांगितले की, रात्रीच्यावेळी पोल्ट्रीत काय घडले ते आम्हास माहिती नाही. येथे पहारेकरी पद रिक्त आहे. शिवाय चाव्याही ऑफीसमध्ये असतात. याचबरोबर अन्य शिर्के व नाईक असे दोन परिचर असून ते सध्या रजेवर असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांचे जबाब घेऊन उर्वरीत दोघांचे ते रजेवरून आल्यानंतर घेतले जाणार असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी करावडे हेही उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ही पोल्ट्री असल्याने त्यांच्याकडून चौकशीच्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. दोन दिवसात या विभागानेही पोल्ट्री अधिकाऱयांकडून कोंबडय़ा चोरीची माहिती मागवली आहे.