बांबू कारागिरी आणि कोकणी मेव्याचे मोदींनी केले विशेष कौतूक : कुडाळ एमआयडीसीतील कॉनबॅकच्या ‘स्फुर्ती’ प्रकल्पात महिलांनी बनविला बॉक्स
- सुरेश प्रभूंनी थेट पंतप्रधानांकडे सुपुर्द केली भेट
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कुडाळ येथील ‘कॉनबॅक’ ह्या बांबू विकासावर कार्य करणाऱया संस्थेंतर्गत चालविल्या जाणाऱया ‘स्फुर्ती’ प्रकल्पामध्ये काम करणाऱया सिंधुदुर्गातील ग्रामीण महिलांनी आपल्या हस्त कौशल्याचा वापर करीत बांबू व करवंटय़ांच्या सहाय्याने बनविलेल्या नक्षीदार बॉक्समधून खास कोकणी मेवा प्रथमच थेट दिवाळी दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी पोहोचला. माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांनी कोकणवासीयांनी पाठविलेली ही अनोखी भेट थेट पंतप्रधान मोदींच्या हाती सुपुर्द केली आणि मोदींनी ती अत्यानंदाने स्वीकारली. ही भेट स्वीकारत त्यांनी कोकणवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याच. त्याचबरोबर सिंधुदुर्गात बांबूवर सुरू असलेल्या या कामाचेही कौतूक केले.
देशाच्या पंतप्रधानांसाठी विशेष करून बनविण्यात आलेल्या या अनोख्या बॉक्समधून आंबा रोल, काजू, जांभूळ स्लाईस, कोकोनट क्रन्च, मोर आवळा, जिंजर स्लाईस इत्यादी अतिशय चवदार असा कोकणी मेवा पाठविण्यात आला होता. अन्न प्रक्रियेची आवश्यक ती सर्व मानांकने पाळून हा मेवा बनविण्यात आला होता.
‘कॉनबॅक’ म्हणजेच ‘कोकण बांबू ऍण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर’ची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बांबू विकासातील कामगिरी सर्वश्रुत आहे. आतापर्यंत केंद्रीय स्तरावरील अनेक मंत्री, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेलिब्रेटी यांच्यापर्यंत विविध माध्यमातून ही कामगिरी पोहोचली होती. पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही कामगिरी पोहोचावी, अशी या प्रकल्पामध्ये काम करणाऱया प्रत्येकाची इच्छा होती. या दिवाळीचे निमित्त साधून ती पूर्ण करण्याचा अखेर सुवर्ण योग आला. अर्थात यासाठी कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी या कामी मोलाची भूमिका बजावली.
दरवषी खासदार प्रभू हे मोदींची दिवाळीनिमित्त शुभेच्छा भेट घेतात. कोरोना महामारीच्या वातावरणामुळे या वेळी भेटीबाबत खरं तर साशंकता होती. मात्र पंतप्रधान मोदींनी प्रभू यांना भेटीसाठी बोलवल्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोकणवासीयांनी पाठविलेला हा नाविन्यपूर्ण बांबू आणि कोकणी मेव्याचा नजराणा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू सफल झाला. यासाठी कॉनबॅक अंतर्गत पारंपरिक बांबू कारागिरांसाठी राबविण्यात येणाऱया ‘स्फुर्ती’ या खादी उद्योग सूक्ष्म, लघु व मद्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या समूह विकास कार्यक्रमात सहभागी महिलांनी अतिशय सुबक हाताने बांबूचा नक्षीदार बॉक्स बनविला.
कॉनबॅकच्या कुडाळ एमआयडीसी येथील बांबू संशोधन केंद्रावर मोहन होडावडेकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून मास्टर कारागिर लता मालवणकर यांनी या बॉक्सचे सुबक मॉडेल तयार केले. त्यानंतर संस्थेतील इतर कारागिरांनी त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. अशा प्रशिक्षित झालेल्या कारागिरांनी आपल्या वाडीमध्ये जाऊन इतर बांबू कारागिरांना या बॉक्सचे विशेष प्रशिक्षण दिले. या बॉक्सवर पंतप्रधान मोदी यांचे नाव व सदिच्छा संदेश खास लेझर तंत्रज्ञानाने कोरण्यात आला. विशेष म्हणजे हा बॉक्स रिकामा न देता त्यामध्ये कोकणातील बांबू सारखाच दुर्लक्षित स्त्राsत म्हणजेच नारळाची करवंटी, ज्यापासून अप्रतिम नक्षीदार असे छोटे बॉक्स तयार करण्यात आले. त्यामध्ये कोकणचा मेवा भरण्यात आला. असा हा पर्यावरण पूरक बांबू व करवंटी यापासून बनविलेल्या बॉक्समध्ये कोकणी मेव्याचा स्वाद असलेला नावीन्यपूर्ण नजराणा प्रभू यांच्या हस्ते कोकणी माणसाची दिवाळी भेट म्हणून पंतप्रधानांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. यातून थेट पंतप्रधानांपर्यंत कॉनबॅकची बांबू कारागिरी व कोकणी मेव्याची चव पोहोचविण्याचे स्वप्न साकार झाले.
अलीकडेच सुरेश प्रभू यांनी बांबू विकासात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्याच्या उद्देशाने ‘इंडिया बांबू फोरम’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून बांबूच्या चळवळीला गती मिळाली आहे. प्रभू यांनी कॉनबॅक स्फुर्ती अंतर्गत हाती घेण्यात आलेली बांबू कारागिरांसाठीची चळवळ व राष्ट्रीय स्तरावरील बांबू विकासाची गरज याबाबत या भेटीत पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे व त्याला मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रभू यांनी आवर्जून सांगितले.