थांबलेल्या ट्रकला टाटा एसची धडक : दुसऱया अपघातात अज्ञात वाहनाची युवकास धडक
प्रतिनिधी/वार्ताहर /निपाणी, कोगनोळी
मंगळवारी कोगनोळीनजीक झालेल्या दोन विविध अपघातांमध्ये दोघेजण ठार झाले. आरटीओ तपास नाक्यानजीक थांबलेल्या ट्रकला टाटा एसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली. दादा महादेव खंदारे (वय 35, मुळगाव बार्शी सोलापूर, सध्या राहणार पुणे) असे मृत चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, ट्रक (एमएच 14 एचयु 7602) हा बेंगळूरहून पुण्याच्या दिशेने जात होत. दरम्यान आरटीओ तपास नाक्यानजीक आल्यानंतर पावती करण्यासाठी सदर ट्रक थांबविण्यात आला होता. त्याच दरम्यान धारवाडहून पुणेकडे जाणारी टाटा एस (एमएच-10 झेड 2137) जात होता. चालक दादा खंदारे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या ट्रकला त्याने जोराची धडक बसली. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच जयहिंद कंपनीचे कर्मचारी प्रकाश बामणे व सहकारी तसेच निपाणी ग्रामीणचे सहाय्यक फौजदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातात वाहनाचे सुमारे लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार करीत आहेत. मृत चालकाच्या पश्चात आई-वडील, भाऊ पत्नी, मुलगी असा परिवार आहे. तर दुसऱया अपघात कोगनोळी सेलटॅक्स ऑफिसनजीक घडला. येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार झाला. हा अपघाता मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. गणेश सुभाष नरके (वय 25, रा. नांदगाव, ता. करवीर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेले माहिती अशी की, गणेश हा दुचाकी क्रमांक एम. एच. 09 एक्मयू 0461 वरुन कोल्हापूरहून निपाणीच्या दिशेने येत होता. दरम्यान कोगनोळी सेलटॅक्स ऑफिसनजीक आल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जयहिंद कंपनीचे सुपरवायझर प्रकाश बामणे व निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक अनिल कुंभार करीत आहेत.