वार्ताहर/ कोगनोळी
कोरोनावर अद्याप नियंत्रण न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आणखी विविध उपाययोजना करण्यात येत असून, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी फाटय़ावर 25 व्या दिवशी आणखी कडक बंदोबस्त करण्यात आला.
कोगनोळी फाटा येथे निपाणी व कागल पोलीस स्थानकातर्फे आपापल्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवून नाकाबंदी केली आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वाहने वगळता अन्य वाहने बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया अत्यावश्यक सेवा देणाऱया सर्व गाडय़ांची तपासणी करून मगच सोडले जात आहे.
प्रवाशांना फाटय़ावर अडवून परत पाठविण्यात येत आहे. यामुळे आपल्या घराकडे जाणाऱया व अन्य ठिकाणी जाणाऱया प्रवाशी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. लांब पल्ल्याचे प्रवाशी अडकून बसल्यामुळे व हॉटेलदेखील खुली नसल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. चालत जाताना ठिकठिकाणी लोक विश्रांती घेत आहेत. काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अशा लोकांची जेवणाची सोय केली जात आहे. मात्र येत्या काळात लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
कर्नाटक पोलिसांतर्फे सीपीआय संतोष सत्यनायक, पीएसआय बी. एस. तळवार, एस. आय. कंबार, एम. डी. घोरी तर महाराष्ट्र पोलिसांतर्फे उपनिरीक्षक रविकांत गच्चे, सुनिल उगळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.