मुंबईत चाकरमान्यांना त्यांच्या कार्यालयांमध्ये जेवणाचे डबे पोहचविणारे डबेवाले आता जगप्रसिद्ध आहेत. अगदी ब्रिटनच्या राजपुत्रानेही त्यांची दखल घेतली आहे. त्यांच्याकडूनच स्फूर्ती घेऊन असेल कदाचित, पण राजस्थानातील कोटा येथील महिला त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून निघाल्या आहेत.
कोटा हे शहर देशभरात इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतभरातून येथे या प्रवेश परिक्षांना बसणारे विद्यार्थी येथे हजारोंच्या संख्येने येतात. येथे या प्रवेशपरिक्षांचे प्रशिक्षण घेताना घरापासून दूर राहिल्याने ‘होमसिक’ होतात. अनेकांना सतत घरची आठवण होत राहते. विशेषतः घरच्या जेवणापासून ते वंचित राहिल्याने काहींना प्रकृतीचा त्रास जाणवतो.
गेल्या काही वर्षांपासून येथील महिलांनी त्यांच्या या समस्या दूर करण्याचे मनावर घेतले आहे. घरच्या चवीचे आणि घराच्याइतके चांगले जेवण या महिला त्यांना बनवून देत आहेत. हे जेवण मुंबईच्या डबेवाल्यांप्रमाणे या महिला या विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या स्थानी पोहचवितात. हे जेवण हॉटेलप्रमाणे ‘कमर्शियल’ नसून घरगुती असते. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचाही विचार पदार्थ तयार करताना केला जातो. विद्यार्थी त्यांची पदार्थांची पसंती त्यांना रिकामे डबे परत करताना त्यात चिठ्ठी ठेवून कळवितात. त्यानुसार पदार्थांमध्ये आणि चवीमध्ये बदल केला जातो. एकंदर, विद्यार्थ्यांना घरच्या जेवणाचा अनुभव यावा अशी काळजी या महिला घेतात. विद्यार्थीही या सेवेसाठी अधिक पैसे मोजयला तयार असतात. त्यामुळे आता कोटातील या डबेवाल्याही प्रसिद्ध होत आहेत.