धरणात प्रतिसेकंद 11 हजार 394 क्युसेक पाण्याची आवक सुरू
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण पाणलोट क्षेत्राला सोमवारी दिवसभर पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात येणारी पाण्याची आवक झपाटय़ाने वाढू लागली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत धरणात प्रतिसेकंद 11 हजार 394 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात 24 तासांत तब्बल एक टीएमसीची वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळनंतरही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता.
कोयना पाणलोट क्षेत्रासह रविवारी पावसाचा जोर कमी झाला असतानाच सोमवारी पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱया पावसामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात येणारी पाण्याची आवकही झपाटय़ाने वाढू लागली आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठय़ात तब्बल एक टीएमसीने वाढ झाली आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 53 (507), महाबळेश्वर 52 (566) आणि नवजा येथे 76 (610) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी धरणातील पाणीपातळी 2042.06 फूट झाली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 15.04 टीएमसी झाला आहे.