वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या काळात ‘डोलो-650’ या वेदना अणि तापावरील गोळीने विक्रीप्रकरणी क्रोसिनला खूपच मागे टाकले आहे. मार्च 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंत कोरोना महामारीच्या 20 महिन्यांमध्ये 567 कोटी रुपयांच्या 350 कोटी डोलो-650 टॅबलेट्सची विक्री झाली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत तर डोलोने विक्रीचे विक्रमच मोडीत काढले होते.
2021 मध्ये डोलो हे 307 कोटी रुपयांच्या विक्रीसह भारतातील दुसरे सर्वाधिक विकले जाणारे ताप आणि वेदनेवरील औषध ठरले. तर जीएसकेचे कालपोल 310 कोटी रुपयांच्या विक्रीसह पहिल्या स्थानावर आहे. क्रोसिन सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. बेंगळूरमधील मायक्रो लॅब्स लिमिटेड ही डोलो-650 ची निर्मिती करणारी कंपनी आहे. तर कालपोल आणि क्रोसिन यांची निर्मिती जीएसके फार्मास्युटिकल्स ही बहुराष्ट्रीय कंपनी करते. डिसेंबर 2021 मध्ये डोलो-650 च्या 28.9 कोटी रुपयांच्या टॅबलेट्स विकल्या गेल्या. डिसेंबर 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 61.45 टक्क्यांनी अधिक आहे.
पॅरासिटामॉल 1960 पासून बाजारात उपलब्ध आहे. क्रोसिन असो वा कालपोल किंवा डोलो औषध कंपन्या विविध ब्रँड नावांद्वारे पॅरासिटामॉलची विक्री करतात. डोलो-650 टॅबलेट्सची लोक केवळ खरेदी करत नसून गुगलदेखील करत आहेत. जानेवारी 2020 पासून आतापर्यंत गुगलवर 2 लाखाहून अधिक लोकांनी डोलो-650 कीवर्ड सर्च केला आहे.
का होतेय लोकप्रिय?
तापावर पॅरासिटामॉल सर्वात उपयुक्त औषध आहे. यामुळे ताप लवकरच कमी होतो. तसेच याचे दुष्परिणामदेखील कमीत कमी आहेत. मुलांपासून वृद्धांपर्यंत ते दिले जाऊ शकते. पॅरासिटामॉल साल्टचे शेकडो ब्रँड्स बाजारात उपलब्ध असल्याचे एका डॉक्टरने सांगितले आहे. डोलो-650 हे औषध 650 एमजीमध्ये येत असल्याने याचा प्रभाव बराचकाळ राहतो. याचमुळे तापाच्या स्थितीत डॉक्टर याला अधिक प्रिस्क्राईब करत असल्याचे मानले जाते.
ब्रँडिंगवर फोकस
मायक्रो लॅब्स लिमिटेड या बेंगळूरमधील कंपनीकडून डोलो-650 टॅबलेट्सची निर्मिती केली जाते. या कंपनीची सुरुवात 1973 मध्ये औषध वितरक जी. सी. सुराना यांनी तत्कालीन मद्रास शहरातून केली. भारतात औषधांची मागणी वाढण्यादरम्यान कंपनीने 1982 मध्ये तामिळनाडूच्या होसूरमध्ये आणखीन एक प्रकल्प स्थापन केला. आता ही कंपनी दिलीप सुराना चालवत आहेत.
30 हून अधिक देशांना निर्यात
सद्यःकाळात मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनी 30 हून अधिक देशांना औषधांची निर्यात करत आहे. यात अमेरिका, ब्रिटन, रशिया, युक्रेन, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारखे देश सामील आहेत. 2009 साली फार्मास्युटिकल्स लिडरशिप समिटमध्ये मायक्रो लॅब्सला कंपनी ऑफ द ईयर म्हणून निवडले गेले. 2010 मध्ये डोलो ब्रँडला इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल्स हेल्थकेअर मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च कॉन्फरन्सने बेस्ट मॅनेज्ड ब्रँड पुरस्काराने गौरविले होते.
मायक्रो लॅब्सने स्वतःचा पॅरासिटामॉल ब्रँड डोलोला 650 एमजीच्या शेणीत लाँच केले होते. कंपनीने स्वतःच्या ब्रँड प्रमोशनमध्ये एफयुओ म्हणजेच ‘फिव्हर ऑफ अननोन ओरिजीन’ संज्ञेचा वापर केला. यामुळे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन वाढले. तापाचे कारण न समजल्यास डॉक्टर डोलो-650 प्रिस्क्राईब करू लागले.